गोवा क्रिकेट असोसिएशनकडून शाळांना ५४ लाख ९२ हजारांचे क्रिकेट साहित्य

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) राज्यातील शालेय क्रिकेटला साधनसुविधा पुरविण्याकडे लक्ष पुरविले आहे, त्याअंतर्गत २०१९-२० कालावधीत राज्यातील एकूण १६९ शाळांना ५४ लाख ९२ हजार पाचशे रुपयांचे दर्जेदार क्रिकेट साहित्य (किट) वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) राज्यातील शालेय क्रिकेटला साधनसुविधा पुरविण्याकडे लक्ष पुरविले आहे, त्याअंतर्गत २०१९-२० कालावधीत राज्यातील एकूण १६९ शाळांना ५४ लाख ९२ हजार पाचशे रुपयांचे दर्जेदार क्रिकेट साहित्य (किट) वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

जीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत काणकोण, पेडणे, म्हापसा, तिसवाडी विभागातील मिळून ७० शाळांना २२ लाख ७५ हजार रुपयांचे क्रिकेट साहित्य वितरीत करण्यात आले आहे. अजून सासष्टी, वास्को, डिचोली, सांगे व फोंडा विभागातील ९९ शाळा बाकी असून त्यांना एकत्रित ३२ लाख १७ हजार पाचशे रुपये किमतीच्या साहित्याचा लाभ मिळेल. बाकी विभागातील शाळांना लवकरच साहित्य वितरीत केले जाईल. शाळांना देण्यात येणारे क्रिकेट साहित्य (किट) दर्जेदार उत्पादन कंपनीचे असल्याचे नमूद केले, असे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी नमूद केले.

कोरोना विषाणू महामारीमुळे गतमोसमात जीसीएच्या शालेय स्पर्धा अर्धवट राहिल्या, तसेच कोविड-१९ मुळे क्रिकेट साहित्य वितरणही लांबले. जीसीएने २०१९-२० मोसमात १४ वर्षांखालील अध्यक्षीय करंडक आणि १६ वर्षांखालील दिलीप सरदेसाई करंडक आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या