जिनिव्हा आंतरराष्ट्रीय वाहन मेळावा वाहनप्रेमींसाठी महत्त्वाचा; टाटा मोटर्सचा २० वर्षांपासून सहभाग

अवित बगळे
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

जागतिक पातळीवर भरवले जाणारे वाहन मेळावे हे वाहन विश्‍वात आगामी काळात होणाऱ्या बदलांची नांदी घेऊन येतात. जिनिव्हा वाहन मेळाव्यात पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या कार, एसयूव्ही सादर करण्यात आल्या.

पणजी: स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा आंतरराष्ट्रीय वाहन मेळावा हा वाहनप्रेमींसाठी कुतुहलाचा विषय असतो. हा मेळावा म्हणजे वाहन कंपन्यांसाठी मॉडेल व कॉन्सेप्ट लॉंचिंगचे डट्रॉइट आहे. यात २० वर्षांपासून भारतातील टाटा मोटर्स सहभाग घेत आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेंझ, लॅम्बोर्गिनी, पिनिफरिना, स्कोडा, फियाट, किया, टोयोटा, होंडा, पोर्शे, फोक्‍सवॅगन, बुगाटी, फियाट आदी ब्रॅंड येथे पाहायला मिळतात, पण यावर्षी काही कंपन्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली.

जागतिक पातळीवर भरवले जाणारे वाहन मेळावे हे वाहन विश्‍वात आगामी काळात होणाऱ्या बदलांची नांदी घेऊन येतात. जिनिव्हा वाहन मेळाव्यात पारंपरिक इंधनावर धावणाऱ्या कार, एसयूव्ही सादर करण्यात आल्या. तसेच भविष्यात सादर होणाऱ्या पर्यावरणपूरक वाहनांची झलकही कंपन्यांनी दाखविली. त्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी सुरू आहे, हेही त्यांनी प्रारूपात दाखवले. विजेवरील कार हे या वर्षीच्या वाहन मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तसेच, या वर्षी वाहन मेळाव्यात शो स्टॉपर म्हणजे चर्चेत दोन भारतीय कंपन्या होत्या. टाटा मोटर्स व महिंद्र अँड महिंद्र.

टाटा मोटर्स गेल्या काही वर्षांपासून भारताबाहेरील ग्राहकांना कंपनीची भविष्यात येणारी वाहने सादर करत आली आहे. त्यानुसार यावर्षी कंपनीने कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही, प्रीमियम हॅचबॅक, एसयूव्ही, इव्ही सादर केली. यात अल्ट्रूझ इव्ही या संपूर्ण इलेक्‍ट्रिक कारच्या कॉन्सेप्टचा समावेश होता. टाटा मोटर्सकडून सादर झालेल्या चार कारच्या डिझाइन, कॉन्सेप्ट हे कंपनीने पूर्णपणे बदल केल्याचे द्योतक मानले जात आहे. भारतात आगामी काळात सात आसनी एसयूव्ही, कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही, प्रीमियम हॅचबॅक व इलेक्‍ट्रिक कार लॉंच होण्याची शक्‍यता आहे. कंपनीकडे भारतात सध्या काही इलेक्‍ट्रिक कारचे पर्याय आहेत. मात्र, त्यांचे व्यावसायिक स्वरूपात उत्पादन सुरू झालेले नाही.

गेल्या काही काळापासून टेस्ला कंपनीचे नाव इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी जागतिक पातळीवर चर्चेवर आहे. तसेच, जगात वेगवान स्पोर्टस कार म्हणून फेरारी, लॅम्बोर्गिनी यांचे नाव आघडीवर असते. पण, या वर्षीच्या जिनिव्ही शोमध्ये एका भारतीय मालकीच्या कंपनीचे नाव चर्चेत राहिले. या वर्षी महिंद्र अँड महिंद्रच्या फिनिफरिना कंपनीने जगातील सर्वांत वेगवान कार या ठिकाणी सादर केली आणि तीही पारंपरिक इंधनावरची नाही. बटिस्टा ही फिनिफरिना कंपनीची इलेक्‍ट्रिक कार आहे आणि ही कार दोन सेकंदाच्या आत ताशी शंभर किमीचा वेग गाठू शकते. तसेच, बारा सेकंदाच्या आत ताशी तीनशे किमीचा वेग गाठते, असा कंपनीचा दावा आहे. कारचा टॉप स्पीड ४०० किमीपेक्षा अधिक आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ४५० किमी अंतर जाऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे. इलेक्‍ट्रिक असूनही या कारची क्षमता १९०० हॉर्स पॉवरची असून, फॉर्म्युला वन कारच्या दुपटीने अधिक आहे. फिनिफरिना कंपनी आनंद महिंद्रा यांनी २०१५ मध्ये विकत घेतली. मात्र, मूळ कंपनीचे मालक बटिस्टा यांचे स्वप्न पूर्ण होईल यावरही लक्ष दिले. कारचे नाव त्यांच्याच नावावरून ठेवण्यात आले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या