कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील आवाज बनावे: चोडणकर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नवनिर्वाचित पाच गटाध्यक्षांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी चोडणकर बोलत होते.

मडगाव: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. काँग्रेसच्या सर्व गटाध्यक्षांनी गोव्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनतेचा आवाज बनावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. 

दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नवनिर्वाचित पाच गटाध्यक्षांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी चोडणकर बोलत होते. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, माजी विजमंत्री आलेक्स सिक्वेरा, दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष जोजफ डायस, गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष फळदेसाई, सचिव जनार्दन भंडारी, दीपक खरंगटे, येमन डिसोझा व फ्लोरियानो कुलासो यावेळी उपस्थित होते. 

भाजप सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आले असून या सरकारविरुद्ध जनतेत असंतोष आहे, असे चोडणकर यांनी पुढे सांगितले. 

भाजप सरकारच्या कारभाराला गोव्याची जनता कंटाळली असून काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने विजयासाठी कंबर कसून काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी आपण सदैव उपलब्ध असू असे कामत यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात आशिष नोरोन्हा (कुंकळ्ळी), रायन व्हियेगस (वेळ्ळी), मानुएल डिकॉस्ता (नुवे), प्रलय भगत (काणकोण), पुष्कल सावंत (कुडचडे) या गटाध्यक्षांना कामत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी गिरीश चोडणकर यांनी कार्यकर्त्यांच्या मनात आगामी विधानसभा निवडणुकीविषयी आत्मविश्‍वास निर्माण केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या