‘स्वयंपूर्ण सर्व्हे’ व्हीजन २०३५ ची नक्कल; काँग्रेसची टीका

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

व्हीजन-२०३५ अहवालात सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा व स्वानंदी गोवा या प्रमुख मुद्यांवर भर देऊन, सन २०३५ पर्यंत गोवा आतंराष्ट्रीय स्तरावर एक आदर्श राज्य म्हणुन पुढे आणण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता.

पणजी: स्वातंत्र्यदिन भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारतासाठी गोवा सरकारचा तथाकथीत स्वयंपूर्ण सर्व्हे अहवाल म्हणजे ‘व्हीजन २०३५’ची हुबेहूब नक्कल (कॉपी) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परत एकदा गोव्यातील भाजप सरकारचा खोटारडेपणा उघड झाल्याची टीका प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. 

हा सर्वे अहवाल उच्च शिक्षण संचालनालय व जिपार्ड या संस्थेने तयार केल्याचे म्हटले होते, परंतु या अहवालातील सर्व सात प्रमुख मुद्दे हे काँग्रेस सरकारचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी नियुक्त केलेल्या नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोवा सुवर्ण महोत्सव विकास परिषदेने तयार केलेल्या गोवा व्हीजन-२०३५ अहवालातून उचलण्यात आले आहेत. या अहवालाचे श्रेय आपल्या सरकारकडे घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

व्हीजन-२०३५ अहवालात सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा व स्वानंदी गोवा या प्रमुख मुद्यांवर भर देऊन, सन २०३५ पर्यंत गोवा आतंराष्ट्रीय स्तरावर एक आदर्श राज्य म्हणुन पुढे आणण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता. हेच मुद्दे काल मुख्यमंत्र्यानी सर्वे अहवालात तयार केल्याचे सांगून  गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काँग्रेस पक्ष स्वागत करून काँग्रेसचा हा दूरदृष्टी ठेवून तयार केलेला अहवाल लवकरात लवकर अंमलात आणला जाईल अशी आशा बाळगतो.  माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी केवळ व्यक्तिगत आकसापोटी विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, प्रा. माधव गाडगीळ, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, डॉ. पी. एस. रामाणी, आर्किटेक्ट चार्लस कुरैया अशा १७ मान्यवरांच्या समितीने तयार केलेला अत्यंत महत्वाचा अहवाल तब्बल सहा वर्षे उघड केला नाही, अशी टीका त्यांनी केली.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या