Ivermectin Tablet: ''लोकांच्या आजाराचा बाजार करण्याच्या हा उपक्रम''?

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या उपचार पद्धतीचे समर्थन केले आहे.

पणजी: कोविड प्रतिबंधासाठी आयव्हरमेक्टीन (Ivermectin) गोळ्या वितरीत करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी जाहीर केल्याच्या 24 तासांत त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. आयव्हरमेक्टीन 12 मिली ग्रॅम गोळ्या घेतल्यास कोविड (Coronavirus) संसर्ग दूर राहतो हा सल्ला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना कोणी दिला. या उपचाराला वैज्ञानिक आधार कोणता आहे? पंतप्रधान कार्यालय (PMO), केंद्रीय आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय परिषद तसेच जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) या उपचार प्रणालीस मान्यता आहे का हे गोमंतकीयांना कळणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) यांनी ताबडतोब याची दखल घ्यावी व लोकांसमोर खुलासा करावा, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस (Goa Congress) समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केली आहे. (Girish Chodankar criticizes the government over the use of ivermectin pill)

गोव्यातील मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यात मतभेद?

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या उपचार पद्धतीचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की आरोग्यमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य खात्याचा हा उत्तम उपक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर या गोळ्यांचे सेवन हे योग्य आरोग्य तपासणी व निदान केल्यानंतरच करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही उपचार पद्धती करण्यास कोणी सल्ला दिला हे कळणे गरजेचे आहे, असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.

COVID-19 Goa: एका दिवसात 75 तर मे महिन्यात 636 जणांचा मृत्यू

देशात वा जगात कुठेही ही उपचार पद्धती सुरू आहे का व असल्यास त्याचे परिणाम काय आहेत हे भाजप सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे असे नमूद करून चोडणकर यांनी म्हटले आहे, की लोकांच्या आजाराचा बाजार करण्याच्या धोरणाखाली अधिक माया जमविण्यासाठी हा उपक्रम जाहीर करण्यात आला आहे का? गेल्यावर्षी ब्रिटनचे युवराज प्रिंस चार्ल्स हे आयुर्वेदिक उपाचारांनी कोविड आजारातून बरे झाल्याचा दावा करून आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपले हसे करून घेतले होते. ब्रिटनच्या युवराजांच्या कार्यालयाने उत्तर गोवा खासदारांचा दावा खोडसाळ असल्याचे सांगून तो फेटाळून लावला होता. आज भाजपच्या जुमलाबाजीमुळे सरकारवरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे. 

कोविड टाळेबंदीच्या काळात असाच प्रचार करून आयुष मंत्रालयाने गोळ्यांचे वाटप केले होते व त्या गोळ्यांच्या सेवनाने कोरोना दूर राहणार अशी ग्वाही दिली होती. आज दुसरी लाट आली असताना व लोक मृत्युमुखी पडत असताना त्या गोळ्यांचा काय उपयोग झाला हे भाजप सरकारने आता लोकांना सांगणे गरजेचे आहे. भाजप सरकार या कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेल्या जुमला उपचार प्रणाली आणून आपली माया जमवीत आहे.  आज भाजप सरकारवर लोकांचा विश्वासच उडाला असुन केवळ भ्रष्टाचार करून लोकांच्या आजारातून पैसे कमविण्याचे भाजपचे धोरण आता सर्वांना कळले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. वैज्ञानिक आधार असलेलीच उपचार पद्धती वा औषधे सरकारने लोकांना द्यावीत हे कॉंग्रेस पक्षाचे ठाम मत आहे, असे नमूद करून त्यांनी म्हटले आहे, की गोमंतकीयांनी सरकारच्या जुमलेबाजीला बळी न पडता, उपचार प्रणालीसाठी वैज्ञानिक आधार देण्याची मागणी सरकारकडे करावी. अधिकृत आरोग्य संघटना व अधिकारिणीची परवानगी असेल तरच औषधांचे सेवन करावे.

 

संबंधित बातम्या