विक्रमी निकालात मुलींचीच सरशी : दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के

goa board
goa board

अवित बगळे

पणजी :

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९२.६९ टक्के लागला. मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत मंडळाचे सचिव भगिरथ शेटये हे उपस्‍थित होते. या परीक्षेस २१. ०८ टक्के विद्यार्थ्यांनी ७५ ते १०० टक्के गुण, ३३.५१ टक्के विद्यार्थ्यांनी ६० ते ७४ टक्के गुण, ३५.७९ टक्के विद्यार्थ्यांनी ४५ ते ५९ टक्के तर ८.८२ टक्के विद्यार्थ्यांनी ३३ ते ४४ टक्के गुण मिळवले आहेत. 
दहावीच्या परीक्षेस यंदा ९ हजार ३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८ हजार ५८१ उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.०८ टक्के आहे. या परीक्षेला ९ हजार ६२० विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी ८ हजार ९७३ उत्तीर्ण झाल्या. एकूण ९३.२७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. परीक्षेस बसलेल्या १८ हजार ९३९ विद्यार्थ्यांपैकी १७ हजार ५५४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९२.६९ लागला आहे. दहावीचा निकाल २०१५ मध्ये ८५.१५ टक्के, २०१६ मध्ये ९०.९३ टक्के, २०१७ मध्ये ९१.५७ टक्के तर २०१९ मध्ये ९२.४७ टक्के लागला होता. यंदाचा निकाल विक्रमी असल्‍याची माहिती मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी दिली.

कवळेत भाऊ-बहिणीची कमाल!
कवळे येथील लोकमान्य टिळक विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या भाऊ व बहिणीने तर कमालच केली आहे. या विद्यालयाची संजना प्रकाश नाईक हिने ९३.३३ टक्के, तर तिचा भाऊ सनील प्रकाश नाईक याने ८८.५० टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय व तृतीय स्थानी येण्याचा मान पटकावला. 
काणकोण तालुक्यातील तीन शासकीय व एक खासगी विद्यालयांचा निकाल यंदा १०० टक्के लागला. १९ पैकी १३ विद्यालयांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. 

८६ शाळांचा निकाल शंभर टक्के
बार्देशमधील ८, डिचोलीतील ४, काणकोणातील ४, धारबांदोड्यातील ४, मुरगावमधील ११, पेडण्यातील ११,  फोंड्यातील १४, सासष्टीतील १७, सत्तरीतील १ आणि तिसवाडीतील १२ विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ७ हजार ७३ जणांना क्रीडा गुण मिळाले, पण त्यापैकी केवळ २७३ विद्यार्थ्यांनाच उत्तीर्ण होण्यासाठी क्रीडा गुणांची मदत घ्यावी लागली. हे प्रमाण केवळ १.५६ टक्के आहे.

विषयानुसार निकाल
दहावीच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा निकाल ९४.११ टक्के लागला आहे. गणित विषयाचा निकाल ९५.१८ टक्के लागला आहे. इंग्रजीचा निकाल ९६.७६ टक्के लागला. पारंपरिक विषय सोडून राष्ट्रीय कौशल्य विकास योजनेंतर्गतचे विषय घेऊन १ हजार ९०६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ७०८  जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ८९.६१ टक्के आहे. आटीआय परीक्षा देणाऱ्या १०१ जणांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ११जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण केवळ १०.८९ टक्के आहे. या विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयातील परीक्षा द्यायची असते.

‘कोविड’ संकटातही दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व आव्हानांचा यशस्वी सामना करत दहावीची परीक्षा निर्विघ्नपणे देण्याची हिंमत दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पुरवणी परीक्षा ३ सप्‍टेंबरपासून
फेरतपासणी, फेरमुल्यांकन, उत्तरपत्रिकेची छाया प्रत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.gbshse.net या संकेतस्थळावर अर्ज करावा.  ३० जुलै पासून या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध होईल. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ३१ जुलैपर्यंत, फेरमुल्यांकनासाठी ८ ऑगस्टपर्यंत, फेरतपासणीसाठी ८ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. छायाप्रत आणि फेरतपासणी या दोहोंसाठी एकाचवेळी तसेच फेरमुल्यांकन आणि फेरतपासणी या दोहोंसाठी एकाचवेळी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा 
३ सप्टेंबरपासून घेण्याचे मंडळाने नियोजन केले आहे.

- महेश तांडेल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com