बारावीच्‍या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी

Dainik Gomantak
शनिवार, 27 जून 2020

यंदाच्या बारावी परीक्षेतील शेवटच्या तीन विषयांची परीक्षा ‘कोविड’ टाळेबंदीमुळे राज्याबाहेर अडकल्याने देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी मंडळ कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. यंदा निकालासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर येणारा ताण लक्षात घेऊन Gbshscgoa.net/results येथेही निकाल पाहण्याची व्यवस्था मंडळाने केली होती. येत्या ७ जुलैपर्यंत विद्यालयांत गुणपत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत.

पणजी :

बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.२७ टक्के लागला असून, यंदाही या परीक्षेत मुलींनी ९०.९४ टक्के यश मिळवत मुलांना मागे टाकले आहे. मुलगे ८७.४३ टक्के यश मिळवू शकले आहेत. यंदा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत, फेरतपासणी आणि फेरमुल्यांकन यासाठी ऑनलाईनच अर्ज व ई - पेमेंट पद्धतीनेच शुल्क स्वीकारले जाणार आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती निवळल्यास ३० जुलैपासून पुरवणी परीक्षा घेण्याचे मंडळाने ठरवले आहे.
मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. त्यावेळी त्यांच्यासोबत मंडळाचे सचिव भगिरथ शेटये, उपसचिव भरत चोपडे व सहाय्‍यक सचिव ज्योत्स्ना सरीन या उपस्‍थित होत्या. श्री. सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या बारावी परीक्षेतील शेवटच्या तीन विषयांची परीक्षा ‘कोविड’ टाळेबंदीमुळे राज्याबाहेर अडकल्याने देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी मंडळ कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. यंदा निकालासाठी मंडळाच्या संकेतस्थळावर येणारा ताण लक्षात घेऊन Gbshscgoa.net/results येथेही निकाल पाहण्याची व्यवस्था मंडळाने केली होती. येत्या ७ जुलैपर्यंत विद्यालयांत गुणपत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मंडळाने यंदा २६ फेब्रुवारी ते २० मार्च अशी परीक्षा घेण्याचे ठरवले होते. मात्र, टाळेबंदीमुळे मराठी, राज्यशास्त्र व भूगोल विषयाची परीक्षा घेता आली नाही, ती नंतर २० ते २२ मे दरम्यान घेण्यात आली. यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकात सहा परीक्षा केंद्रेही मंडळाला सुरू करावी लागली होती. ही परीक्षा एकंदरीत १७ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेस १७ हजार १८३ जण बसले होते. त्यापैकी १५ हजार ३३९ उत्तीर्ण झाले.

विद्यार्थिनींचे यश
या परीक्षेस ९ हजार ४ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी ८ हजार १८८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. ८ हजार १७९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ७ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

वाणिज्य शाखेचा सर्वाधिक निकाल
बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक ९२.८२ टक्के लागला. वाणिज्य शाखेची परीक्षा ५ हजार ३६२ जणांनी दिली होती. त्यापैकी ४ हजार ९७७ जण उत्तीर्ण झाले. सर्वांत कमी निकाल कला शाखेचा ८५.३० टक्के लागला. या शाखेतून ४ हजार १७८ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३ हजार ५६४ जण उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ८८.९६ टक्के लागला. या शाखेतून ४ हजार ८२१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४ हजार २८९ जण उत्तीर्ण झाले. व्यावसायिक शाखेचा निकाल ८८.९१ टक्के लागला. या शाखेतून २ हजार ८२२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ५०९ जण उत्तीर्ण झाले.

व्यावसायिक शाखेतील विद्यार्थ्यांची बाजी
काही विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांत व्यावसायिक शाखेचा निकाल सर्वाधिक ४५.०५ टक्के लागला आहे. या शाखेतून ९१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४१ जण उत्तीर्ण झाले. सर्वांत कमी निकाल कला शाखेचा ३७.२४ टक्के लागला. या शाखेतून ३४१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२७ जण उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून २२० जणांनी परीक्षा दिली, त्यापैकी ९६ जण उत्तीर्ण होत निकाल ४३.६४ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ४४.७६ टक्के लागला, परीक्षा दिलेल्या २८६ पैकी १२८ जण उत्तीर्ण झाले.

सर्वाधिक गुण अवघ्यानाच
बारावीच्या परीक्षेत केवळ १५.७१ टक्के विद्यार्थ्यांना ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. ६० ते ७४ टक्के गुण ३८०३ टक्के विद्यार्थ्यांना, तर ४५ ते ५९ टक्के गुण ३७.५७ टक्के विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. ३३ ते ४४ टक्के गुण ७.९० टक्के विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

कुजिराचा निकाल सर्वाधिक
परीक्षेत कुजिरा केंद्राचा निकाल सर्वाधिक लागला आहे, तर सर्वांत कमी निकाल फोंडा केंद्राचा लागला. ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल डिचोली, म्हापसा, मडगाव, पणजी, नावेली, पर्वरी या केंद्रांचा लागला आहे.

शंभर टक्के निकालाची विद्यालये
परीक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी व अनुदानित विद्यालय असलेल्या कुजिरा येथील डॉ. के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष मुलांसाठी असलेली जुनेगोवे येथील सेंट झेवियर्स अकादमी आणि ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानचे उच्च माध्यमिक विद्यालय यांचा निकालही शंभर टक्के लागला आहे. विनाअनुदानित असलेल्या मुष्ठिफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल तसेच धेंपो विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकालही शंभर टक्के लागला आहे.
 

संबंधित बातम्या

फोटो फीचर