जीवनावश्यक वस्तू द्या, अन्यथा मोकळे सोडा!

Baburao Revankar
गुरुवार, 30 जुलै 2020

झुआरीनगरातील कंटेन्‍मेंट झोनमधील झोपडपट्टीतील लोकांची कोणतीही कोरोना पडताळणी तपासणी केली जात नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात नाही, नाहक लोकांना बंदिस्त केले आहे, असा आरोप करीत बुधवारी सकाळी पुन्हा एकदा झुआरीनगरातील लोक घराबाहेर पडले व कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासमोर निदर्शने केली.

्बाबुराव रेवणकर

मुरगाव :

झुआरीनगरातील कंटेन्‍मेंट झोनमधील झोपडपट्टीतील लोकांची कोणतीही कोरोना पडताळणी तपासणी केली जात नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात नाही, नाहक लोकांना बंदिस्त केले आहे, असा आरोप करीत बुधवारी सकाळी पुन्हा एकदा झुआरीनगरातील लोक घराबाहेर पडले व कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासमोर निदर्शने केली.
झुआरीनगर येथील झोपडपट्टीतील जे लोक कोरोनामुक्त आहेत, त्यांनाही बंदिस्त केले आहे. लोकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. सरकारकडून कोणतीच मदत मिळत नाही. कोरोना तपासणी संथगतीने सुरू आहे, त्याला गती देणे आवश्यक आहे. पण, प्रशासन प्रयत्न करीत नाही अशी तक्रार लोकांची आहे. आवश्यक खाद्यसाठा पुरविला जात नाही. त्यामुळे लोकांची उपासमार वाढली आहे. त्यासंबंधी तक्रार करूनसुद्धा ठोस पावले उचलली जात नाही, अशी तक्रार रहिवाशांची आहे. आपल्या तक्रारींकडे लोकप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.

मंगळवारपासून लोकांत असंतोष
काल मंगळवारी सायंकाळी लोकांनी रस्त्यावर येऊन प्रशासनाविरोधात आवाज उठविला. त्यावेळी आमदार एलिना साल्ढाणा तसेच स्थानिक पंचांवरही दोषारोप करण्‍यात आले. आमचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी आमदार साल्ढाणा येणार आहेत म्हणून सांगण्यात आले होते. पण, त्या फिरकल्याच नसल्याने लोकांना संताप अनावर झाला. परिणामी लोक रस्त्यावर बॅरीकेड्सपर्यंत जमा झाले होते. पोलिसांनी लोकांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला होता. तथापि, आज बुधवारी सकाळी आमदार एलिना साल्ढाणा झुआरीनगरातील कंटेंनमेंट झोनमध्ये आल्या. पण, त्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला. झुआरीनगरातील लोकांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. जेवणाच्या वस्तू मिळत नाही. त्‍या उपलब्‍ध करून देण्‍यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना आमदारांनी केल्या. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी साल्ढाणा यांनी केले.

परिस्‍थिती हाताळण्‍यास सरकार
अपयशी : मारीयान रॉड्रिग्‍स
काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य मारीयान रॉड्रिग्‍स यांनी कोरोनाचा फैलाव वाढविण्यास राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. लोकांची कोरोना तपासणी केली जात नाही, याबद्दलही त्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. कोरोनामुक्त लोकांना कंटेन्‍मेंट झोनच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. रॉड्रिग्स यांनी केली.

लोकांना सर्वतोपरी मदत : उपजिल्‍हाधिकारी
झुआरीनगर कंटेंनमेंट झोनमधील लोकांना सर्वतोपरी मदत कार्य पुरविण्याचे काम प्रशासनाकडून चालले आहे, असे यावेळी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांनी स्पष्ट केले. कोरोनामुक्त असलेल्यांना कंटेन्‍मेंट झोनमधून मुक्त केले जाईल. पण, त्यांना पुन्हा झुआरीनगर कंटेन्‍मेंट झोनमध्ये जाता येणार नाही, असे लोकांच्या मागणीला अनुसरून उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासनाने फिरवली पाठ, लोक हैराण
मुरगाव तालुक्यातील सर्व कंटेन्‍मेंट झोनमधील लोक प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने हैराण झाले आहेत. प्रत्येकजण मोकळे करा, अशी मागणी करीत आहे. मांगोरहिल आणि खारवीवाडा कंटेन्‍मेंट झोनमधील नगरसेवक सैफुल्ला खान आणि लविना डिसोझा यांनीही लोकांना मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत कंटेन्‍मेंट झोनमधील लोक बरेच हैराण झाल्याने परिसरात प्रशासनाने घातलेल्या बॅरीकेड्सपर्यंत एकत्र होऊन निदर्शने करीत आहेत.

- महेश तांडेल

 

संबंधित बातम्या