लसीकरणासाठी गोमंतकीयांना प्राधान्य द्या : विजय सरदेसाई      

लसीकरणासाठी गोमंतकीयांना प्राधान्य द्या : विजय सरदेसाई      
goa Vaccination.jpg

सासष्टी :  कोरोना व्हायरसवर (CoronaVirus)  मात करण्यासाठी गोव्यात (Goa)  लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून गोवा सरकारने विकत घेतलेल्या लसी देण्यासंबंधी गोमंतकीयाना (Goa citizens)  प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. परंतु, मडगाव नागरी आरोग्य केंद्रात वेर्णा औद्योगिक वसाहतीतील (Verna Industrial Estate) कर्मचारी येऊन लस घेत असल्यामुळे स्थानिकांना लसीकरणासाठी स्लॉट मिळत नसून या कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी वेर्णा औद्योगिक वसाहतीत लसीकरण देण्यास सुरुवात करा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai)  यांनी केली. (Give priority to Goa citizens for vaccination: Vijay Sardesai) 

आमदार सरदेसाई यांनी आज मडगाव नागरी आरोग्य केंद्रात भेट दिली असता, त्यांना वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करणारे कर्मचारी लसीकरणास येत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील मागणी केली. फातोर्डा फॉरवर्डचे नगरसेवक रवींद्र नाईक, पूजा नाईक, आग्नेल जोनास, निकलाव क्रास्टो, लिंडन परेरा, पूजा नाईक, श्वेता लोटलीकर व इतर उपस्थित होते. वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केल्यास त्यास काहीही आक्षेप नाही. पण, या कर्मचाऱ्यांनी मडगावात येऊन लस घेणे योग्य नाही. हे कर्मचारी मडगावात लस घेण्यासाठी येत असल्याने स्थानिकांना लसीकरणासाठी स्लॉट मिळत नाही, अशी माहिती आमदार सरदेसाई यांनी दिली. 

गोवा सरकारने गोमंतकीयांसाठी लसी विकत घेतल्या असून गोव्यातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. पण, सरकारला औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या पाच हजार लोकांचे पडलेले असून  गोव्यातील पंधरा लाख लोकांचे काहीही पडून गेलेले नाही, हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत नाही. पण, गोव्यात मात्र उलट होत आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला. आम्ही बेकार म्हणून आरोग्य केंद्राला भेट दिली नसून सरकारचा खोटारडेपणा सिध्द करण्यासाठी भेट दिली आहे. यावर सरकारने त्वरित विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com