गोमेकॉ प्रशासनाची बनवाबनवी

covid 19
covid 19

पणजी

गोमेकॉमध्ये चार दिवसांपूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाबाधीत संशयीत महिलेवर सांतिनेज स्मशानभूमीत गुपचूपपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु ती महिला गोव्यातील नसून, बांदा-सावंतवाडीची असल्याचा खुलासा गोमेकॉच्या अधिष्ठातांनी आरोग्य खात्याच्या अव्वर सचिवांना पाठविला होता. परंतु सांतिनेजमध्ये जेव्हा त्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी गोमेकॉतून महापालिकेला जी पावती दिली होती, त्या पावतीवर त्या महिलेचा पत्ता पेडणे तालुक्यातील लिहिला असल्याने गोमेकॉचे प्रशासन तोंडावर पडले आहे. 
दैनिक गोमन्तकने संशयित कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू म्हणून वृत्त १२ मेरोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यावरून ती महिला पेडणे तालुक्यातील नसून ती बांदा-सावंतवाडीतील आहे, असा गोमेकॉ प्रशासनाचा दावा होता. त्यानुसार गोमेकॉच्या अधिष्ठातांनी अव्वर सचिवांना जे खुलासा करणारे पत्र लिहिले होते, त्या पत्रात ती महिला बांद्याचीच असल्याचे म्हटले होते. ते पत्र काल (बुधवारी) व्हायरल झाले आणि गोमेकॉच्या अधिष्ठातांचा खोटारडेपणा उघडा पडला. मृत्यूमुखी पडलेली महिला बांद्यातील नसून, ती पेडणे तालुक्यातील असलेला पत्ता खुद्द गोमेकॉने अंत्यसंस्कारावेळी दिलेल्या पावतीवर लिहिलेला असल्याचा पुरावा हाती आला आहे. त्यामुळे गोमेकॉचे प्रशासन किती खोटे बोलतेय, हे आता उघड झाले आहे.  
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ११ रोजी दुपारी बारा वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणला होता, तेव्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गोमेकॉतील कर्मचाऱ्यांनी हात लावण्यास मनाई केली, त्याचबरोबर काळजी घेण्याचेही सूचित केले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ती शववाहिका पाण्याने धुवून काढली, त्यानंतर आज ती पूर्णपणे सॅनिटाईझ करून घेतली. 

कर्मचाऱ्यांना तपासणीस पाठविले!
पेडण्यातील त्या संशयित कोरोनाबाधीत महिलेचा मृतदेह आणण्यासाठी शववाहिकेबरोबर गेलेला कर्मचारी व चालकांना आज महापौर उदय मडकईकर यांनी सकाळी तत्काळ तपासणीसाठी आरोग्य केंद्रात पाठविले. संशयित कोरोनाबाधीत महिलेचा मृतदेह आणल्यानंतर आम्हाला काहीच कल्पना का दिली गेली नाही, याबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांच्याकडे विचारणा केली. यापुढे अशा बाबतीत आपणास माहिती द्यावी, असे स्पष्ट सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. कोरोनाचा विषय गंभीर आहे, कर्मचाऱ्यांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे हे लक्षात घ्या, असेही संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावले. 

ती महिला पेडण्यातील

 गोमेकॉच्या ११३ वार्डमध्ये मृत्यू पावलेली ती महिला गोव्यातीलच असल्याने तिला अधिक उपचारासाठी नातेवाईकांच्या विनंतीवरून बांबोळीला गोमेकॉत पाठवले होते अशी माहिती सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांनी दिली. गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल ती महिला बांदा सावंतवाडी येथील असल्याचे आपल्या शासकीय पत्रात नमूद केले होते. प्रत्यक्षात या दोन्ही शहरांत ११ किलोमीटरचे अंतर आहे.
याबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, “ही महिला ९ मेस बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातुन उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिच्या सोबत जवळचे कोणीच नातेवाईक नव्हते. ती ज्या घरात भाड्याने राहत होती ते घरमालक तिला घेऊन आले होते. त्या महिलेला ताप व दम लागत होता. उपचारादरम्यान त्यांच्या रक्ताचा अहवाल विषाणुजन्य तापाचा आला होता. अधिक उपचारासाठी आम्ही त्या महीलेला आरोसच्या जिल्हा रूग्णालयात हलवित होतो. तसे त्या महिलेला व सोबत आलेल्यांना कळविले; मात्र येथे आपले जवळचे कोणीच नाही व आपण मुळ पेडणे येथील असल्याने आम्हाला गोवा मेडीकल कॉलेज येथे पाठवा, असे तिने व सोबत आलेल्या घर मालकाने सांगितले. त्यामुळे आम्ही त्यांना 108 रूग्णवाहीकेने बांबोळी गोवा येथे हलविले.”
त्या महिलेने दाखल होताना पेडणे तालुक्यातील एका गावाचा पत्ता दिला होता. तिच्याकडे त्या पत्त्याबाबत खातरजमा करणारी सरकारी कागदपत्रे होती. त्याचमुळे तिला उपचारासाठी गोव्यात हलवताना उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने तिच्या गोव्यातील कागदपत्रांची खातरजमा करूनच प्रवेशाची परवानगी दिली होती, अशी माहिती मिळाली आहे.

कागदपत्रे व्हायरल होण्याचे सत्र
बुधवारी आरोग्य सचिव आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन यांच्यात झालेला गोपनीय पत्रव्यवहार लोकांसमोर आला होता. तर आज ७ कोरोना रुग्णांची नावे, वय आणि इतर माहिती असणारी लॅबमध्ये आलेली यादीच जशीच्या तशी व्हायरल झाल्याने आरोग्य खात्यात नेमके काय चालले आहे....असा प्रश्न लोक विचारत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी याबाबत कडक भूमिका घेतलेली आहे. या प्रकरनाची चौकशी केलेली असून ज्याने हे केले असेल त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
सविस्तर माहिती अशी की ज्या ७ कोरोना रुग्णांच्या ट्रूनेट टेस्ट करण्यात आल्या होत्या.त्या रुग्णांच्या थुंकीचे नमुने अधिकृत पडताळणीसाठी गोमेकॉतील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. व्हायरल यादीत त्यांचे नाव, वय, लिंग आधी माहिती असून लॅबमध्ये टेस्टिंग दरम्यान देण्यात आलेली ही यादीच व्हायरल झाली आहे.
मार्गदर्शक तत्वे आणि नियमानुसार अशी ओळख सांगणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र गोवा आरोग्य खात्याकडून वारंवार गोपनीय माहिती असणारी कागदपत्रे व्हायरल केली जात असल्याचे यामुळे सिद्ध होते.

एखाद्या रुग्णाची खासगी माहिती सार्वजनिक करणे गुन्हा असून आम्ही याबाबत कठोर कारवाई करणार आहोत. हे अहवाल अत्यन्त गोपनीय असतात अशाप्रकारे माहिती उघड करणे योग्य नाही.असा प्रकार येथून पुढेही कोणाकडून झाला तरी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com