गोवा : 415 दुकानांचे 13 वर्षांचे भाडे थकले; दुकान वाटपातील गैरकारभार उघड  

पणजी.jpg
पणजी.jpg

पणजी :  तब्बल १३ वर्षे भाडे न देता उलट भाड्याला घेतलेले दुकान भलत्याच व्यक्तीला पुन्हा भाड्याने देऊन लाखो रुपये कमावणाऱ्या दुकानदार भाडेकरुला बाहेर काढण्याचे सोडा, त्याच्यावर कायदेशीर कारवाईही करण्याची धमक पणजी महापालिकेकडे नाही. त्यामुळे दुकानदाराकडून भाडे मिळत नसल्याने सरकारी अनुदानावर आणि पणजीच्या सर्वसामान्य लोकांच्या करातून पणजी महापालिकेचा सध्या कारभार सुरु आहे. (Goa: 13 years rent of 415 shops exhausted; Shop allotment malpractice exposed)

पणजी महापालिकेला 415  दुकानांचे भाडे गेली 13  वर्षे  मिळालेले नाही. त्यामुळे महापालिका हतबल झाली आहे. दरवर्षी पणजीतील इतर दुकानदार व नागरिकांवर कर वाढ करून आणि सरकारी अनुदानावरच पणजी महापालिका आपला कारभार पुढे ढकलत आहे. 2002 साली मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पणजी मार्केटसाठी दोन भव्य दुमजली बाजार प्रकल्प गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून उभे केले. त्यात 414 लहान मोठी दुकाने बांधली. पणजी शहरातील बाजार स्वच्छ व  प्रशस्त व्हावा, या हेतूने पर्रीकर यांनी हे प्रकल्प उभे केले होते. मात्र प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेळीच पर्रीकर यांचे सरकार त्यांच्याच सहकाऱ्यांनी पाडले आणि महापालिकेचा कारभार आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थक पॅनेलकडे गेला. त्यानंतर दुकाने वाटपात इतका प्रचंड गोंधळ, घोटाळा झाला की काहींनी दोनपेक्षा जास्त दुकाने आपल्या नावावर करून घेतली.    

हस्तांतर गैरमार्गाने!
पर्रीकर हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री  झाल्यानंतर 2013  साली त्यांनी पणजी मार्केटमधील दुकानांचा विषय तडीस लावण्यासाठी निवृत्त जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल  यांना मार्केटच्या दुकानांची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले. अगरवाल यांनी 95  टक्के दुकाने परस्पर देण्यात आल्याचे, ती देताना नियमांची पायमल्ली केल्याचे अहवालात नमूद केले. त्यानंतर महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनीही मार्केटमधील दुकानांची पाहणी केली. त्यांनीही 90  टक्के दुकाने वाटपात घोटाळा झाल्याचे नमूद केले. महापालिकेवर एका गटाची सत्ता व आमदार दुसऱ्या पक्षाचा! यामुळे  पर्रीकर यांनी केलेले प्रयत्न वाया गेले. गेली 13  वर्षे महापालिकेला येथील दुकानांचे भाडे मिळत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com