गोवेकरांनो सावधान! 24 तासांत 940 कोरोना रुग्ण तर 17जणांचा मृत्यू

Goa Corona.jpg
Goa Corona.jpg

पणजी: राज्यात दररोज रुग्णसंख्या हजारांच्या जवळ पोचली असून सोमवारी सर्वाधिक कोरोनाचे 17 बळी गेले असून 940 नवे कोरोनाबाधित रूग्ण सापडले. त्यामुळे राज्यात कोरोना नियंत्रणासाठी कडक ‘एसओपी’ची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात राज्यशासन व आरोग्य खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महामारीवर नियंत्रणासाठी येत्या दोन दिवसांत त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे घोषणा करतील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. (In Goa 940 corona cases and 17 deaths in 24 hours)
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राणे बोलत होते. डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा होते. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7 हजाराच्यावर पोचली आहे. हे सर्व रोखण्यासाठी कोविड नियंत्रण ‘एसओपी’ची कठोरपणे अंमलबजावणी राज्यात करणे गरजेची आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. मात्र कोरोना नियमाची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम सुरू केले जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात ऑक्सिजन, रेमडेसीवर आदींचा अजिबात तुटवडा नाही. इतर यंत्रसामग्रीही पुरेसी आहे. सरकार शक्य ते उपाय करुन कोरोना नियंत्रणात आणण्यास कटिबद्ध आहे. मात्र प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. गरज नसताना  घराबाहेर पडू नये,  मास्क न घालता बाहेर पडूच नये. लोकांना जमा करू नये. रेस्टॉरंट व हॉटेलमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आवाहन यावेळी आरोग्य मंत्र्यांनी केले. अझिलो इस्पितळांमध्ये  कोरोना रुग्णासाठी 50 जादा खाटा उपलब्ध केल्या जाणार असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुद्धा 121 हा वार्ड आता कोरोना वार्ड म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व फोंडा इस्पितळात खाटांची संख्या वाढवण्यात   आली आहे. खासगी इस्पितळाच्या संचालकांशी उद्या बैठक घेऊन त्यांना त्यांच्या इस्पितळातील 40 टक्के खाटा कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याची विनंती आपण  करणार आहे, असे राणे यांनी सांगितले.   

काणकोणात नवे २५ रूग्ण 
काणकोणात सोमवारी  सर्वाधिक 25 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आतापर्यंत 130 करोनारूग्ण सापडले आहेत. 
2727 जणांची तपासणी
आज 2727  जणांची तपासणी करण्यात आली. त्यात 940 व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्या. आज दिवसभरात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 428 व्यक्ती बऱ्या झाल्या. आजच्या 17 मृत्यूमुळे राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींची संख्या 900 झाली आहे. आज ज्या 17 व्यक्ती कोरोनामुळे दगावल्या त्यात 12 गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी. ३ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, मडगाव. 1 हॉस्पिसियो इस्पितळ, मडगाव. 1 आझिलो इस्पितळ, म्हापसा येथे दाखल झालेल्या होत्या. कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी (87.61) हळूहळू कमी होत आहे.

आज 2727 लसीकरण
राज्यात आज 2727 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. लस उत्सवांतर्गत राज्यातील 9 पंचायतीमध्ये आयोजित लसीकरण कार्यक्रमात 1692 व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली, तर सरकारी इस्पितळे व खाजगी इस्पितळात मिळून 6051 इतके लसीकरण झाले.

फिरते तपासणी वाहन
आजपासून फिरते कोरोना तपासणी वाहन सुरू करण्यात आले आहे. दिवसाला एक हजारपर्यंत कोरोना तपासणी करण्याची क्षमता आहे.गोमेकॉच्या समोर ठेवण्यात आलेल्या या वाहनात प्रलंबित तपासण्या पूर्ण केल्यानंतर सदर वाहन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव येथे ठेवले जाईल. त्यानंतर आझिलो इस्पितळ आवारात ठेवण्यात येणार आहे. गोमेकॉमध्ये दरदिवशी प्रत्येकी 900 कोरोना तपासणी करणारी दोन यंत्रे बसवण्यात आलेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com