'जननी जन्मभूमी कौल’ मध्ये गोमंतकीय महिलांचा कौल ठरणार भविष्याला दिशा देणारा
जननी जन्मभूमी कौलDainik Gomantak

'जननी जन्मभूमी कौल’ मध्ये गोमंतकीय महिलांचा कौल ठरणार भविष्याला दिशा देणारा

गोव्यातील आरोग्य, संपत्ती आणि संस्कृती या तीन विषयांवरली गोमंतकीय स्त्रीची स्पष्ट मते 'जननी जन्मभूमी कौलातून' व्यक्त होतील.

पेडण्यापासून पोळेपर्यंतच्या गोव्याला व्यापणारा हा दुसरा 'जननी जन्मभूमी कौल’ राजकीय असेल आणि नसेलही. त्याला प्रस्थापित राजकीय मुलामा नसेल, पण गोव्याला आणि गोव्यातील जनतेला कसे राजकीय नेतृत्व अपेक्षित आहे, याचे सुस्पष्ट मत त्यातून मिळेल. कौल घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने निश्चित केलेल्या 1600हून अधिक बुथांच्या प्रारुपाचीच मदत घेण्यात येणार आहे. यातून हा कौल खऱ्या अर्थाने पूर्ण गोव्याला व्यापणारा ठरणार आहे.

या कौलांत विशेष सांगायचे झाले तर गोमंतकीय महिलांचा या जनमतांमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. महिलाच का असा प्रश्न येथे अनेकांना उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण घराची गृहिणी, लक्ष्मी आज खरी कर्तृत्विनी ठरली आहे, ती प्रपंचाची दोरी एकाहाती पेलत असतांना तिने नेहमीच देशाची, राजकारणाची, अधिकाऱ्याची, डॉक्टरची, आईची, पत्नीची अशा अनेक भूमिका साकराल्या आहेत आणि अजूनही या जबाबदाऱ्या ती सांभाळतच आहे.

स्त्रीची मते प्रगल्भ आहेत आणि त्यांवर विशिष्ट राजकीय विचारसरणीचा प्रभाव पुरुषवर्गापेक्षा जास्त आहे. संस्कृतीसंवर्धानाची आणि गोव्याची ओळख जपण्याची तिची असोशी, तिने केलेले कार्य आणि प्रयत्न नेहमीच बेदखल राहिले, पण तरीही तीने आपल्या परीने तिने राज्य संवर्धनाचा पर्वत अजूनही करांगुळीवर पेलून धरला आहे. आता, वेळप्रसंग पाहून, संधी बघून ती राजकीयदृष्ट्याही अभिव्यक्त होते आहे आणि आपल्या कर्तृत्वाची छाप या क्षेत्रावरही सोडते आहे. जन्मभूमीच्या व्यथा- वेदना, चढ उतार, तीने अनुभवले आहेत. म्हणून प्रसुतीकळा अनुभवणाऱी स्त्री पुरुषाना कळणे शक्य नाही. गोमंतकीय स्त्रीचे आकलन केवळ भावनिकच नाही तर राजकीय आणि तटस्थही आहे.

प्रापंचिक अर्थकारणातून तिने मिळवलेले भानही आताच्या घडीला मोलाचे आणि महत्वाचे आहे. एक मतदार म्हणून गोमंतकीय स्त्री संख्येनेही पुरुषाच्या तुलनेत पुढे आहे. आजवर तिच्या मताला गृहित धरले गेले आणि दुर्लक्षही करण्यात आले. याची भरपाई ‘जननी जन्मभूमी कौल’ करणार आहे. त्यातून गोवा कसा विचार करतोय, त्याला काय हवे आहे, राजकारण्यांकडून त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत, याचे स्वच्छ, अभिनिवेशविरहित चित्र या कौलातून समोर येणार आहे. गोव्यातील आरोग्य, संपत्ती आणि संस्कृती या तीन विषयांवरली गोमंतकीय स्त्रीची स्पष्ट मते या कौलातून व्यक्त होतील. त्यांच्या मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या क्षमतेचेत्यांनी याच तीन क्षेत्रातून मुल्यांकन करावे, अशी अपेक्षा आहे.

या तिन्ही क्षेत्रांचा राजकारणाशी असलेला दृढ संबंध लक्षात घेतल्यास या कौलाचे महत्त्व गोमंतकीय स्त्रीच्या ध्यानी यावे. हा या 'जननी जन्मभूमी कौल’चा उद्देश आहे. आरोग्य हा आपल्या देशात नित्य चर्चेच्या ऐरणीवर राहाणारा विषय आहे. गोव्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा अन्य राज्यांच्या तुलनेत विस्तृत आणि प्रगतही आहे असे मानले जाते. तेव्हा तिच्या भविष्यकालीन विस्ताराविषयीच्या गृहलक्ष्मीच्या कल्पना आणि विद्यमान स्थितीचा अभिप्राय महत्त्वाचा आहे.

कौटुंबिक स्वास्थ्य हा स्त्रीच्या भावविश्वाशी निगडीत विषय असून तिचे मत नेहमीच पुरुषापेक्षा स्थिर असते. रोजगार, आर्थिक स्थैर्य, प्रगतीच्या संधी याविषयीचे स्त्रीचे मत अर्थातच धोरणकर्त्यांसह राजकीय क्षेत्रालाही दिशादर्शक ठरणार आहे. विशेषत: राजकीय नेत्यांच्या भौतिक विकासाच्या कल्पना आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यानी उचललेली पावले यांचे मुल्यांकन या कौलातून होणार आहे. त्याचबरोबर गोमंतकीय स्त्री सध्याच्या सांस्कृतिक विचारसरणीकडे कशी पाहातेय, याचा वेध हा कौल घेणार आहे. त्यातूनच गोव्याच्या भविष्यकालीन वाटचालीचे दिशानिर्देशन ठरणार आहे.

गोव्याचे वर्तमान नितळ व्हावे आणि भविष्य आश्वासाक असावे या एकमेव हेतूने ‘गोमंतक’ने हे जनमताचे पाऊल उचलण्याचा निग्रह केला आहे. माध्यमांच्या उत्तरदायित्वाच्या आमच्या कल्पनेचीच ही अभिव्यक्ती आहे आणि तिला अपेक्षित यशप्राप्तीकडे नेताना एका प्रदिर्घ लोकलढ्याची तयारीही आम्ही केली आहे. आता हा ‘जननी जन्मभूमी कौल’ यशस्वी करणे हे प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकियाने आपले आद्य कर्तव्य मानावे, हीच विनंती.

Related Stories

No stories found.