गोव्यात नवी इनिंग सुरु करण्यासाठी 'आप' तयार

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या आम आदमी पक्षाने (आप) सासष्टीतील बाणावली, नावेली, वेळ्ळी, कुंकळ्ळीसह केपे मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांत आपने पक्षबांधणीचे काम नेटाने हाती घेतले आहे.

मडगाव: चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या आम आदमी पक्षाने (आप) सासष्टीतील बाणावली, नावेली, वेळ्ळी, कुंकळ्ळीसह केपे मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघांत आपने पक्षबांधणीचे काम नेटाने हाती घेतले आहे.( In Goa, the Aam Aadmi Party has started building a party)

सार्वत्रिक जिल्हा पंचायत निवडणुकीत बाणावलीतून आपचे युवा नेते हेन्झल फर्नांडिस निवडून आल्यानंतर व जिल्हा पंचायतीच्या नावेली पोटनिवडणुकीत मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद तसेच गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांचा आपमधील प्रवेशानंतर आपचे सासष्टीतील कार्य व प्रभाव झपाट्याने वाढत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आपचे ज्येष्ठ नेते मनीश सिसोदिया यांनी रविवारी वेळ्ळीत उपस्थिती लावल्यानंतर आपच्या सासष्टीतील कार्यास रेटा मिळाला आहे.  

बाणावलीत हेन्झल फर्नांडिस यांनी बाणावलीचे मातब्बर नेते व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांचे उमेदवार मिनीन फर्नांडिस यांंचा पराभव केला. आलेमाव यांच्या बालेकिल्ल्यास हे खिंडार पाडल्याने आपच्या कार्यकर्त्यांमध्ये हुरुप आला होता. काही दिवसांनी नावेलीत झालेल्या पोटनिवडणुकीत आपचा हा आत्मविश्वास दिसून आला. या निवडणुकीत आपच्या उमेदवार माटिल्डा डिसिल्वा यांनी जोरदार टक्कर देत २४२८ मते मिळवली. ही निवडणूक काॅंग्रेसच्या उमेदवारीवर लढलेल्या प्रतिमा कुतिन्हो यांनी आपच्या या कामगिरीमुळे प्रभावित होऊन आपणही आपमध्ये प्रवेश केला. कुतिन्हो यांच्या प्रवेशाने आपला आगामी निवडणुकीसाठी एक सक्षम उमेदवार मिळाला आहे.

मडगाव: शेडो कौन्सिलसह दोन संघटना सिटीझन चाॅईस पॅनलच्या छत्राखाली

नावेली जिल्हा पंचायत मतदारसंघात नावेली, तळावलीसह वेळ्ळी मतदारसंघातील सारोझार व धर्मापूर शिरली पंचायतींचा समावेश होतो. या दोन्ही पंचायतींमध्येही मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने आपने वेळ्ळी मतदारसंघावरही लक्ष केंद्रित केले आहे. सिसोदिया यांची वेळ्ळीत सभा घेऊन वेळ्ळीबाबत आपण गंभीर असल्याचे आपने स्पष्ट केले आहे. 
वेळ्ळीच्या शेजारच्या कुंकळ्ळी मतदारसंघही आपच्या रडारवर आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील गिरदोलीचे माजी सरपंच मिलाग्रीस गोन्साल्वीस यांनी शनिवारी आपमध्ये केलेल्या प्रवेशाने हे स्पष्ट झाले आहे. 

सासष्टीच्या शेजारच्या केपे तालुक्यातही आपला प्रभाव वाढवण्याचा आपचा प्रयत्न आहे. केपे पालिकेच्या निवडणुकीत आपने आपले पॅनल स्थापन करून १२ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. आपच्या स्थानिक नेत्या पॅट्रिसिया फर्नांडिस यांच्यासह प्रतिमा कुतिन्हो व आपचे कार्यकर्त्यांनी केपे पालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे.  या निवडणुकीत आपचा प्रभाव दिसेल असा दावा आपच्या नेत्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या