आपची ‘गोवन्स अगेन्स्ट कोरोना’ मोहीम सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राहुल म्हांबरे म्हणाले की, आम्ही येथे आमच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी देव बोडगेश्वराचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. संपूर्ण गोव्यात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या आमच्या सर्व ऑक्सिमित्रांना देव बोडगेश्वराचा आशीर्वाद असणार असून या मोहिमेमध्ये तोच आमच्यासाठी एक आध्यात्मिक शक्ती असणार आहे.

पणजी: आम आदमी पक्षातर्फे राज्यात ‘गोवन्स अगेन्स्ट कोरोना’ मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचे प्रमुख राहुल म्हांबरे यांनी आज म्हापसा येथील बोडगेश्‍वर मंदिराला भेट दिली. यावेळी मंदिरातील प्रमुख पुजाऱ्यांची ऑक्सीमीटरने प्राणवायू तपासणी करण्यात आली. ही मोहीम सुरू झाल्यापासून लोकांकडून ही तपासणी करून घेण्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे व लोक ही तपासणी स्वच्छेने करून घेऊन आपल्या आरोग्याची माहिती घेत आहेत. 

याप्रसंगी बोलताना म्हांबरे म्हणाले की, आम्ही येथे आमच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी देव बोडगेश्वराचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. संपूर्ण गोव्यात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या आमच्या सर्व ऑक्सिमित्रांना देव बोडगेश्वराचा आशीर्वाद असणार असून या मोहिमेमध्ये तोच आमच्यासाठी एक आध्यात्मिक शक्ती असणार आहे. या कोविडविरुद्धच्या लढ्यामध्ये आम्ही आमच्या बाजूने शक्य तेवढे प्रयत्न करणार असून बाकी सर्व देवावर सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

श्री बोडगेश्वर हा म्हापसा आणि उत्तर गोव्यातील लोकांचा राखणदार आहे. आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा तो नेहमी पूर्ण करतो व सर्व गोमंतकीयांना त्याच्याविषयी श्रद्धा असल्याने त्यांच्या प्रार्थना तो ऐकेल असा विश्वास सर्व गोवेकरांना आहे. मंदिरातील पुजाऱ्यांबरोबर यावेळी उपस्थित असलेल्या इतर नागरिकांच्या प्राणवायू स्तराची तपासणीही करण्यात आली. म्हांबरे यांच्याबरोबर सुनील सिग्नापुरकर आणि श्रीपाद पेडणेकर हेही उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या