कोलवाळ कारागृह कामकाजात नेहमीच अनियमबद्धता असल्याचा आरोप

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

गेल्या सुमारे चार महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते तेथील एकंदर घटनांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. तरीसुद्धा तशा स्वरूपाच्या घटना कमी झालेल्या नाहीत.

म्हापसा: कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहाच्या कामकाजात विविध बाबतींत नेहमीच अनियमबद्धता तसेच गैरप्रकार असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणी घडलेल्या एकंदर घडामोडींवरून प्रकर्षाने दिसून येते. एकंदरीत हे कारागृह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

गेल्या सुमारे चार महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते तेथील एकंदर घटनांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. तरीसुद्धा तशा स्वरूपाच्या घटना कमी झालेल्या नाहीत. दोषी ठरवलेले गुन्हेगार त्या कारागृहात सजा भोगत असतात. परंतु, या कारागृहातून कित्येकदा कैदी पळून जाणे, कारागृहाच्या आवारात कैद्यांकडे तसेच कर्मचाऱ्यांकडे अंमली पदार्थ सापडणे, कैद्यांकडे भ्रमणध्वनी संच सापडणे, आजारी असलेल्या कैद्यांच्या बाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातून न पाहणे अशा विविध घटना घडलेल्या आहेत. या कारागृहात सर्वच बाबतींत समस्या आहेत. प्रशासनात गलथानपणा होत असल्याचाही आरोप सातत्याने केला जात आहे.

या कारागृहाच्या आवारात कोणतेही गैरप्रकार होत नाहीत, असे या कारागृहाचे महानिरीक्षक गुरुदास पिळर्णेकर यांनी अलीकडेच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. परंतु, या कारागृहात जे काही गैरप्रकार चालतात त्याबाबत श्री. पिळर्णेकर यांनी सजगतेने जाणून घ्यावे, असे आवाहन गोवा राज्य शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक ऐश्वर्या साळगावकर यांनी दोन दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेतून केले होते.

या कारागृहात कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याबाबत ‘जेल गार्ड्‍स’सारख्या निम्नस्तरीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जाते व त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातात; पण, जे खरोखरच जबाबदार असतात त्या उच्चपदस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणताही जाब विचारला जात नाही. अशा घटनांबाबत ‘जेल गार्ड्‍स’ची चौकशी अवश्य करावी; पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोकळे सोडू नये, असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी रामा कोरगावकर या ‘जेल गार्ड’कडे पन्नास ग्रॅम अमलीपदार्थ सापडल्याच्या आरोपावरून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याच्यासंदर्भातील चौकशी सुरू आहे. हल्लीच्या काळात या कारागृहातून कैदी पळून जाण्याच्या घटना कित्येकदा घडलेल्या आहेत. एक कैदी कचरा टाकण्यासाठी म्हणून गेला होता व तो पळून गेला असे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पलायन करणाऱ्या त्या कैद्यांना कर्मचाऱ्यांची फूस असल्याशिवाय असे प्रसंग होणे शक्यच नाही, असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे.

अलीकडेच अन्वर शेख टायगर या नावाने कारागृहातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून संप्रेषित झाला होता. त्यानंतर कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी सावरासावर करताना स्पष्ट केले होते की तसे काहीच झालेले नाही व त्यासंदर्भातही चौकशी सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

अलीकडेच त्या ठिकाणी साठपेक्षा जास्त वय असलेला एक वयस्कर कैदी आजारी असल्याने डॉक्टरकडे नेण्यासाठी कारागृहातील कर्मचाऱ्यांकडे याचना करीत होता. तब्बल चार तास त्याना तसेच ठेवण्यात आले होते. त्याला पिण्यासाठी पाणीही देण्यात आले नाही. त्यानंतर तो कैदी कोविडबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. अशा प्रकारे या कारागृहात सर्वच बाबतींत अनागोंदी व्यवहार चाललेला आहे. शासकीय यंत्रणेचेही त्यासंदर्भात दुर्लक्ष आहे, असे त्यातून स्पष्ट होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या