सावंत सरकारकडून 35 हजार विधवा महिलांना दिलं जातयं अर्थसहाय्‍य 

सावंत सरकारकडून 35 हजार विधवा महिलांना दिलं जातयं अर्थसहाय्‍य 
widows.jpg

पणजी : पतीचे निधन होऊन विधवा बनलेल्या महिलांच्या वाट्याला विविध प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यांच्‍या समस्‍यांसंदर्भात आज जगभरात ‘विधवा’ जागृती दिन (International Widow Day) साजरा केला जाणार आहे. गोव्यात (goa) विधवा महिलांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने योजना आखलेली असून त्याचा अनेक महिलांना फायदा झालेला आहे. या योजनेचा लाभ सुमारे 35 हजार विधवांना मिळत असल्याची माहिती समाजकल्याण खात्याचे संचालक (Director of Social Welfare Department) उमेश जोशी यांनी ‘गोमंतक’शी बोलताना दिली.‌ (Goa announces financial help to 35,000 widows)

विधवा महिलांना सध्या दोन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य प्रत्येक महिन्याला दिले जात आहे. त्‍यात वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. ही रक्कम अडीच हजारांवर नेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (pramod sawant) यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या महिलांचे दर महिन्याला शंभर ते अडीचशे अर्ज संमत केले जातात, अशी माहिती खात्याकडून देण्यात आली आहे. 

2010पासून जागृती 
2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा जागृती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आता कोरोनामुळे विधवांसाठीच्या दिनाचे महत्त्व आणखी वाढले आहे. कारण, महामारीच्या तडाख्यात अनेक महिलांना पती गमवावा लागलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या विधवा काम करत होत्या, त्यापैकी कित्येकांना आपला रोजगार गमावून बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून विधवा दिनाच्या पूर्वसंध्येला गोवा महिला मंचाने तशी मागणी उचलून धरलेली आहे. 

अर्थसहाय्‍य ठरते लाखमोलाचे! 
राज्यात कोरोनामुळे (covid19) तीन हजारांच्या आसपास बळी गेलेले आहेत. त्यामुळे अनेक महिलांवर विधवा होण्याचा प्रसंग आलेला आहे. या पार्श्वभूमीवर समाजकल्याण खात्याकडे विचारणा केली असता विधवा महिलांना अर्थसाहाय्य करणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नसली, तरी कोरोना महामारीला प्रारंभ झाल्यापासून मागील वर्षभरात 10 ते 20 टक्के इतकी वाढ पाहायला मिळाल्‍याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांशी संपर्क साधला असता त्यांनी मिळणाऱ्या अर्थसहाय्याचा फार मोठा आधार घर चालवण्यासाठी होत असल्याचे सांगितले. सदर साहाय्य मिळण्यास विलंब झाल्यास ओढाताण होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाढत्या महागाईच्या पार्श्‍वभूमीवर या साहाय्यात वाढ करण्याच्या सरकारच्या घोषणेचे त्यांनी स्वागत केले. मात्र, त्‍याकडे समाजकल्याण संचालक जोशी यांनी लक्ष वेधले. मात्र, अजून ही वाढ अंमलात येणे बाकी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com