गोवा बनतोय सट्टेबाजीचे केंद्र

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी करंझाळे - ताळगाव येथील एका फ्लॅटवर छापा टाकून छत्तीसगढच्या चारजणांना अटक केली.

पणजी: परदेशात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी क्राईम ब्रँच पोलिसांनी करंझाळे - ताळगाव येथील एका फ्लॅटवर छापा टाकून छत्तीसगढच्या चारजणांना अटक केली. गेल्या एका महिन्यातील गोवा पोलिसांनी घातलेला सट्टेबाजीप्रकरणीचा पाचवा छापा आहे. त्यामुळे गोवा हे आयपीएल सट्टेबाजीचे केंद्र बनत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ताळगाव येथील छाप्यात अटक केलेल्यांची नावे रणजोत सिंग छाब्रा, सुनील मोटवानी, कपिल तोलानी व विनय गंगवाणी अशी असून हे सर्वजण रायपूर - छत्तीसगढ येथील आहेत. या छाप्यावेळी त्यांच्याकडून अनेक मोबाईल्स तसेच एका लॅपटॉपसह इतर सॉफ्टवेअर सामग्री मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आयपीएल सामन्यांवर या संशयितांनी सुमारे ५० लाखांची सट्टेबाजी घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आयपीएल सुरू झाल्यापासून ते गोव्यातून सट्टेबाजी करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ते सट्टेबाजी देशात तसचे परदेशातून मोबाईल फोनवर स्वीकारत होते. आतापर्यंत कळंगुट पोलिसांनी तीन तर क्राईम ब्रँच पोलिसांनी दोन प्रकरणे नोंद केली आहेत. गोव्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय सट्टेबाजीसाठी वास्तव्य करून असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी आयपीएल क्रिकेट सामने सुरू होण्यापूर्वी ताळगाव येथे एक फ्लॅट भाडेपट्टीवर घेतला होता.

फ्लॅट मालकानेही त्यांचे सी फॉर्म भरून पोलिसांत दिले होते व त्यांची पडताळणीही करण्यात आली होती. संशयितांनी हे सर्व सोपस्कार पूर्ण केले होते. फ्लॅटमध्ये आयपीएल सट्टेबाजी करण्यात येत असली तरी त्याचा संशय कोणाला येऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली होती.

संबंधित बातम्या