महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार लागले कामाला

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

पणजी महापालिकेच्या निवडणुकीला आणखी पाच महिन्यांचा कालावधी आहे, परंतु सध्या इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रभागात कामाला लागले आहेत. 

पणजी: पणजी महापालिकेच्या निवडणुकीला आणखी पाच महिन्यांचा कालावधी आहे, परंतु सध्या इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रभागात कामाला लागले आहेत. 

महापालिकेत ३० नगरसेवक आहेत. आमदार बाबूश मोन्सेरात यांची सत्ता होती आणि ते भाजपमध्ये आल्याने चार नगरसेवक सोडले, तर २६ जण भाजपवासी म्हणावे लागतील. सुरेंद्र फुर्तादो आणि त्यांच्या पत्नी रुथ फुर्तादो हे मोन्सेरात यांना मानत असले, तरी ते मूळ काँग्रेसी आहेत. फुर्तादो यांनी दोन्ही प्रभागात आपले बस्तान बसविले आहे. आमदार मोन्सेरात भाजपमध्ये आल्याने मूळ भाजपचे असलेल्या नगरसेवकांना ही बाब पटली नाही. उघडपणे नाराजी व्यक्त न करता पुढील निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी सुरू केली आहे. 

मूळ भाजपचे नगरसेवक आपल्या प्रभागात विकासकामांना गती मिळत नसल्याचे खासगीत सांगतात. लोकांची कामे होत नसल्याने ते नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे पुढील निवडणुकीत उमेदवारीच नको, अशा मतापर्यंत ते पोहोचले आहेत.

आमदार मोन्सेरात हे वैयक्तिक करिष्म्यावर सत्तेपर्यंत जाणारे नगरसेवक निवडून आणतात. आता ते भाजपात आल्याने ३० ही प्रभागात भाजपचेच उमेदवार निवडून आणण्यावर भर देणार आहेत आणि त्यांनी अशी मनीषा अनेकवेळा व्यक्त केली आहे. परंतु भाजपचाच एक गट पडद्याआडून पक्षविरोधी भूमिका घेण्याची स्थिती आहे. पक्षीय पातळीवर निवडणूक झाली, तर आम आदमी पक्ष पणजी शहरात या निवडणुकीच्या माध्यमातून नशीब अजमावू शकतो. काँग्रेस अद्याप याठिकाणी सक्षम नेतृत्वाच्या शोधात आहे. सुरेंद्र फुर्तादो दे दोन प्रभागात अडकून पडतात. पक्षीय पातळीवर निवडणूक झाली नाही, तर अपक्ष उमेदवार या निवडणुकीत पाहायला मिळतील.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या