Goa Politics: सासष्‍टीत काँग्रेससमोर बंडखोरीचे आव्‍हान
Goa CongressDainik Gomantak

Goa Politics: सासष्‍टीत काँग्रेससमोर बंडखोरीचे आव्‍हान

2022 च्या निवडणुकीत काँग्रेस सासष्टीचा बालेकिल्ला राखणार काय?

मडगाव: सासष्‍टी तालुक्‍यावर आजपर्यंत काँग्रेस (Goa Congress) पक्षाचे वर्चस्‍व राहिले आहे. मात्र 2012 सालच्‍या काँग्रेसविरोधी लाटेत या तालुक्‍यात पक्षाच्‍या आमदारांची संख्या सातवरून दोनवर आली.

हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात होता. परंतु 2017 सालच्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ‘कमबॅक’ करताना आठपैकी सहा जागा जिंकल्या. या पार्श्वभूमीवर 2022 च्या निवडणुकीत काँग्रेस सासष्टीचा बालेकिल्ला राखणार काय, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे.

Goa Congress
Goa Politics: मांद्रे मतदार संघातील कॉंग्रेसची उमेदवारी सतीश शेटगावकरांना?

काँग्रेस प्रदेश समितीत जे आता नवीन बदल झाले आहेत, त्यानुसार तालुक्‍यातील आठ मतदारसंघात काँग्रेस पक्ष उमेदवारी कोणाला देणार हाही प्रश्न चर्चेत आहे. यावेळी जर बंडाळी झाली तर पक्ष त्याला तोंड कसे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मडगाव, नावेली आणि कुडतरी या तीन मतदारसंघांत काँग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने अनुक्रमे दिगंबर कामत, लुईझिन फालेरो व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्‍स यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास नक्की मानले जात आहे. तरीसुद्धा माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो यांनी कुडतरीत काँग्रेस पक्षाच्‍या उमेदवारीवर दावा सांगितला आहे. त्‍यातच काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-राष्ट्रवादी यांच्यात युती झाली नाही तर कुडतरीत राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Goa Congress
Goa: कुंकळ्ळी नगरपालिकेतील फाईली होतात गायब

येथे स्‍थिती बिकट

फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसची स्थिती तेवढी चांगली नाही तर बाणावलीतही चर्चिल आलेमाव यांच्‍यापुढे त्यांची डाळ शिजण्याची शक्यता कमीच आहे. अशातच तिथे मिकी पाशेको यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केल्याने लॉयला फर्नांडिस काय भूमिका घेतील, ते पाहावे लागेल. बाणावलीत आम आदमी पक्षाचे व्‍हेंझी व्हिएगस यांचेही जबरदस्त आव्हान काँग्रेससमोर असेल.

नुवे, वेळ्ळी, कुंकळ्ळीत खरी कसोटी

सासष्‍टी तालुक्यात काँग्रेससाठी उमेदवारी देण्यावरून खरी डोकेदुखी ठरणार आहे ती नुवे, वेळ्ळी आणि कुंकळ्ळी या तीन मतदारसंघांत. प्रदेश समितीचे कार्याध्यक्षपद आलेक्स सिक्वेरा यांना मिळाल्याने नुवेतून त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. मात्र मिकी पाशेको आणि राजू काब्राल हेही शर्यतीत आहेत. कुंकळ्ळीत युरी आलेमाव यांच्याविरोधात एल्विस गोम्स यांनी आव्हान उभे केले आहे तर वेळ्ळीत ज्यो डायस, सावियो डिसिल्वा आणि बेंजामिन सिल्वा असे तीन इच्छुक उमेदवार आहेत. त्‍यामुळे या तिन्‍ही मतदारसंघांत शेवटच्या क्षणी बंडखोरी होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही आणि हीच काँग्रेस पक्षासाठी खरी डोकेदुखी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com