गोवा अधिवेशन: या सरकारला अधिवेशनात उघडे पाडू: सरदेसाई

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला सर्व विरोधकांना एकत्र करून या अधिवेशनात उघडे पाडू, असा इशारा दिला आहे. 

मडगाव: महामारीच्या काळातही स्वतःच्या स्वार्थासाठी सामान्य लोकांशी भाजपने प्रतारणा  केल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला असून या सरकारला सर्व विरोधकांना एकत्र करून या अधिवेशनात उघडे पाडू, असा इशारा दिला आहे. 

महामारीच्या काळात सरकार लोकांच्या मदतीला धावून येण्याऐवजी स्वार्थ साधण्यात मग्न होते. लोकांच्या प्रखर विरोधानंतर या सरकारने आपली लोकविरोधी कारस्थाने रद्द केली. या सरकारने म्हादई विकली, कोळशाची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी तीन प्रकल्पांना हे सरकार पाठिंबा देत आहे. जुने गोवे ग्रेटर पणजी पीडीएत सामील करणे, गोव्यात गांजाची लागवड करण्याचा प्रस्ताव तसेच शेळ मेळावली आयआयटी प्रकल्प आणि नगरपालिका अधिसूचना या सरकारने लोकविरोधामुळेच रद्द केली, असे त्यांनी म्हटले आहे.

हे सरकार पैशाच्या हव्यासापोटी अनेक गैरप्रकार करू पाहात असून लोकांनी त्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. या अधिवेशनात आपण लोकायुक्त संस्था अधिक सुदृढ करण्यासाठी विधेयक सादर केले  आहे. लोकयुक्तामुळे कामगारगेट,  किनारपट्टी सफाई अशी सरकारची अनेक  भ्रष्टाचारी प्रकरणे उघडकिस आली असा दावा करून हे सरकार सध्या ही लोकायुक्त  संस्थाच कमकुवत करू पाहत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

गोवा विधानसभा अधिवेशन आजपासून सुरू -

गोव्यातील खासगी आस्थापनात ८० टक्के गोमंतकीयांना रोजगार हे खासगी विधेयक आपण मांडले असून राष्ट्रीय शिक्षण धोरण, घर बांधणी भत्ता, लोहिया मैदान सौंदर्यीकरण तसेच अन्य लोकविरोधी निर्णयाविरुद्ध इतर विरोधकांच्या साहाय्याने सरकारला घेरू, असे त्यांनी म्हटले. ऊस उत्पादक, स्वातंत्र्य सैनिक, मोटारसायकल पायलट, स्थानिक टॅक्सीचालक, कोविड योद्धे यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधातही आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या