कोरोनाचं संकट चहुबाजूंनी, तरीही गोवा 'शूटिंग हब'

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

दुसऱ्या बाजूने महामारीच्या काळातही गोवा चित्रीकरणाचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे. गोव्यात वीसहून अधिक चित्रीकरणे चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

पणजी: एका बाजूने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढत चालले असल्याने गोव्यात भीतीचे वातावरण पसरलेले असले, तरी दुसऱ्या बाजूने महामारीच्या काळातही गोवा चित्रीकरणाचे केंद्र बनल्याचे दिसून येत आहे. गोव्यात वीसहून अधिक चित्रीकरणे चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत चित्रीकरणावर निर्बंध असल्यामुळे तसेच महाराष्ट्रबरोबर दिल्ली, उत्तर प्रदेश येथील स्थिती बिघडल्याने चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्यांची काम चालू ठेवण्याच्या बाबतीत गोची झालेली आहे. गोव्यात जरी रुग्णसंख्या वाढत असली, तरी वरील राज्यांच्या तुलनेत येथील स्थिती चांगली असल्याने त्यांनी गोव्याकडे मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात वीसहून अधिक चित्रीकरणे चालू असून यात तीन चित्रपटांच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. याशिवाय दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज आणि म्युझिक व्हिडिओ यांचीही चित्रीकरणे चालू आहेत.

कदंब महामंडळाच्या 40 आंतरराज्य बससेवा बंद 

गोवा मनोरंजन संस्थेकडून राज्यात चित्रीकरण करण्यासाठी परवानगी दिली जाते. मात्र त्यांची परवानगी न घेताच कित्येकदा बेकायदेशीररीत्या चित्रीकरणे केली जातात असे दिसून आलेले असून संस्थेने यापूर्वी ते स्पष्ट केलेले आहे. मनोरंजन संस्थेचा ना हरकत दाखला न घेता चित्रीकरण केल्यास कारवाई होऊ शकते असा इशारा त्यांनी दिलेला आहे. गोवा मनोरंजन संस्थेने राज्यात चित्रीकरणासाठी ऑनलाइन परवानगी देण्याची व्यवस्था हाती घेतली असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, राज्यात चित्रीकरणासाठीचे दर शासकीय यंत्रणांनी वाढविलेले असून राज्यातील समुद्रकिनाऱ्यांसारख्या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी दरदिवशी 50 हजार रुपये दर आकारला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील नद्या व समुद्रामध्ये चित्रीकरण करण्यासाठीही कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडून दरदिवशी 50 हजार रुपये असा दर ठरविण्यात आलेला आहे.

म्हापसा सत्तास्थापनेसाठी भाजप-काँग्रेस गोटातून नगरसेवकांना आमिषे 

गोव्यात हिंदी चित्रपटांबरोबर अलीकडच्या काळात दक्षिणेकडील तेलुगू, कन्नड, तामिळ आदी चित्रपटांची चित्रीकरणे केली जातात. तसेच हिंदी व अन्य भाषांतील दूरचित्रवाणी मालिका, वेब सिरीज, टीव्हीसाठीच्या जाहिराती, म्युझिक व्हिडीओ यांचे चित्रीकरण करण्यासाठी राज्याला पसंती दिली जाते.
अलीकडेच नेरूल येथे बालाजी टेलिफिल्म्सच्या चित्रीकरणाच्या वेळी काही टॅक्सींची तोडफोड करण्याची घटना घडली होती. या प्रकारणी नंतर टॅक्सीमालक संघटनेच्या काही सदस्यांना अटक झाली होती. टॅक्सीमालक संघटनेने यासंदर्भात ''टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ गोवा'' आणि ''लाईन प्रोड्युसर्स'' यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज्यात कोरोनाचे संकट असतानाही 30 ठिकाणी चित्रीकरण सुरू असल्याचा दावा केला आहे. या चित्रीकरणाच्या ठिकाणी सुमारे दोनशे लोक असतात. अशा वेळी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत नाही का असा सवाल सदर संघटनेने उपस्थित केलेला आहे.

Goa Lockdown: वास्को-मुरगावात राहणाऱ्या मजुरांनी धरला गावचा रस्ता 

संबंधित बातम्या