गोव्यात ख्रिसमस सेलिब्रेशन आणि ३१ डिसेंबरच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की राज्यात ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम सुरू होते. यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असूनही राज्य ३१ डिसेंबरसाठी सज्ज होऊ लागले आहे.

पणजी: दरवर्षी डिसेंबर महिना सुरू झाला की राज्यात ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस सेलिब्रेशनची धूम सुरू होते. यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असूनही राज्य ३१ डिसेंबरसाठी सज्ज होऊ लागले आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या हॉटेलमध्ये चालू वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेलच्या खोल्या आतापासूनच बुक केल्या जात आहेत. अनेक हॉटेल्स त्यांच्या हॉटेलचे दराचे प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘न्यू इअर’च्या पार्टीला यावर्षी आयोजित होणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी राज्यात यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच्या लॉकडाऊननंतर आता राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने पर्यटक येण्यास सुरवात झाली आहे. खरे तर गेले कित्येक दिवस घरात बसून असलेले आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे दिवसेंदिवस घरात बसून असलेले लोक गोव्यात येऊन आपला मूड ताजातवाना करीत एन्जॉय करताना दिसत आहेत.

मात्र, या सगळ्या वातावरणात सुरक्षित सामाजिक अंतर आणि मास्क घालण्याबाबतच्या एसओपीचा मात्र फज्जा उडताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी ही पर्यटक मंडळी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी न घेता फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार अधिक तर होणार नाही ना, याची भीती स्थानिकांना वाटत आहे.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या