‘त्या’ दहा हत्तींची दोन महिन्यांच्या आत तपासणी करा'

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

स्पाईस प्लांटेशन व फार्मस् तसेच फोंडा व कुळे येथील रिसॉर्टच्या ताब्यात असलेल्या ‘त्या’ दहा हत्तींची दोन महिन्यांच्या आत तपासणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

पणजी : स्पाईस प्लांटेशन व फार्मस् तसेच फोंडा व कुळे येथील रिसॉर्टच्या ताब्यात असलेल्या ‘त्या’ दहा हत्तींची दोन महिन्यांच्या आत तपासणी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. पीपल्स फॉर एनिमल्सतर्फे याचिका सादर करण्यात आली होती. या हत्तींच्या तपासणीस कोणीही हरकत न घेतल्याने ही याचिका निकालात काढण्यात 
आली. 

वन खात्याने राज्यातील विविध स्पाईस प्लांटेशन व फार्मस् तसेच रिसॉर्टमध्ये असलेले हत्ती ताब्यात घेतले होते. मात्र या हत्तींची निगा तसेच त्यांना खाद्य पुरवठा करणे शक्य व्हावे म्हणून ते प्लांटेशन व फार्म्समध्येच ठेवण्यात आले होते. या हत्तींचा व्यावसायिक वापर केला जाऊ नये यासाठी पीपल्स फॉर एनिमल्सतर्फे याचिका सादर करण्यात आली होती. त्यामध्ये प्रधान मुख्य वनपाल, गोवा वन्यजीव मंडळ, गोवा सरकार, मे. जंगल बुक रिसॉर्ट, मे. सहकारी स्पाईस प्लांटेशन, मे. ट्रॉपिकल स्पाईस प्लांटेशन, मे. सहकारी स्पाईस फार्मस् याना प्रतिवादी करण्यात आले होते. वन खात्याने हे हत्ती ताब्यात घेऊनही ते प्लांटेशन व फार्म्समध्येच ठेवले आहेत असा दावा याचिकादाराने केला होता व त्याचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग होण्याची शक्यता व्यक्त केली होती. 

ही याचिका सुनावणीस आली असता सरकारतर्फे वन खात्याने बाजू मांडताना सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेले ते दहा हत्ती जरी स्पाईस प्लांटेशन किंवा फार्मस् येथे ठेवण्यात आले असले तरी त्याचा दुरुपयोग होत नाही याची शहानिशा करण्यात आली आहे. या याचिकेतील स्पाईस प्लांटेशन व फार्मस् याच्या वकिलांनीही त्याचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही असे स्पष्ट केले. याचिकादाराने या हत्तींची तपासणी तज्ज्ञ वन्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी व त्यावेळी याचिकादाराला उपस्थित राहण्याची अनुमती दिली जावी अशी विनंती केली असता, त्याला प्रतिवाद्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले.

संबंधित बातम्या