'त्या' दलबदलू 10 आमदारांच्या निवाड्याला गोवा खंडपीठात आव्हान
Girish Chodankar

'त्या' दलबदलू 10 आमदारांच्या निवाड्याला गोवा खंडपीठात आव्हान

पणजी: आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या विषयी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी दिलेल्या निवाड्याला काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे ही माहिती दिली. चार दिवसापूर्वी अशी याचिका न्यायालयात सादर केल्याचे त्यांनी सांगितले.(Goa bench challenges verdict of 10 MLAs)

थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर, पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांताक्रूझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, सांतआंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासिओ डायस, काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस आणि केप्याचे आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पक्षांतर बंदी कायदा यातील तरतुदीनुसार या दहा आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी सभापतींकडे अपात्रता याचिका सादर करून चोडणकर यांनी केली होती. त्या याचिकेवर 18 महिन्यांनी निवाडा देताना सभापतींनी याचिका फेटाळून लावताना आमदार हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरत नाहीत कारण त्या पक्षाचे विलीनीकरण भाजपमध्ये झाल्याचा निवाडा दिला होता. त्या निवाड्याला आता काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या 10 काँग्रेसच्या फुटिर आमदारांनी व 55 काँग्रेस कार्यकर्त्यांनी कटकारस्थान रचून पक्षाने घेतलेल्या ठरावासाठी पक्षाच्या ‘लेटरहेड’चा व ‘सील’चा गैरवापर करून पक्ष भाजपमध्ये विलीन होत असल्याचा बनावट दस्तावेज तयार करत बनवेगिरी व फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात 20 एप्रिल 2021 रोजी देऊनही गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना दिले होते.  

'प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी प्रदेश काँग्रेस समितीची 10 जुलै 2019 रोजी बैठक बोलावण्यात आली नव्हती तसेच बैठकही झाली नाही. समितीच्या दस्ताऐवज नोंदणी पुस्तिकेत ‘त्या’ दहा काँग्रेस आमदारांनी पक्ष विलिनीकरणाचा जो दस्तावेज सादर केला आहे त्याची कोणतीच नोंद काँग्रेस पक्षाकडे नोही. पक्षाची 29 मे 2019 रोजी व 24 जुलै 2019 रोजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती असे पक्ष बैठकीतील कामकाजसूचीमध्ये नोंद आहे,'असे या तक्रारीत नमुद करण्यात आले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com