‘भाजपच्या सेवा सप्ताहाची काँग्रेसला भीती’: भाजप

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने १४ ते २० सप्टेंबरदरम्यान  सेवा सप्ताह पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वाढदिवसानिमित्त झगमगाट नसेल, धांगडधिंगाडा, पार्टी नसेल तर केवळ सेवा असेल.

पणजी: काँग्रेसचे नेते कार्यकर्ते केवळ पत्रकार परिषदांपुरतेच मर्यादीत झाले आहेत. त्यांना आज कोणता विषय हाती घ्यावा याची चिंता असते. याउलट भाजपचे कार्यकर्ते जनतेच्या सेवेत असतात. त्याचमुळे आता भाजप सेवा सप्ताह पाळणार असल्याने कॉंगेसला भीती वाटत आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते सुभाष फळदेसाई यांनी आज लगावला.

ते म्हणाले, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार कोविड महामारी असताना भाजप पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करत आहे. चोडणकरांच्या या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्तरावा वाढदिवस आहे. या निमित्ताने १४ ते २० सप्टेंबरदरम्यान  सेवा सप्ताह पाळण्यात येणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वाढदिवसानिमित्त झगमगाट नसेल, धांगडधिंगाडा, पार्टी नसेल तर केवळ सेवा असेल. भाजपचा कार्यकर्ते कोविड संक्रमणाच्या कालावधीत सेवा बजावतच आहेत. चोडणकर यांनी जनतेची सेवा करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करून पहावे किती प्रतिसाद मिळतो ते.

किराणा साहित्याचे वाटप, मुखावरणांचे वाटप असो की इतर मदत असो आजवर केवळ भाजपचेच कार्यकर्ते जनतेच्या मदतीला धावून गेले आहेत. मतदान केंद्रनिहाय पासून राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता तन मन धन अर्पून कोविड महामारीविरोधातील लढ्यात आपले योगदान देत आहे. त्याचमुळे सेवा सप्ताह पाळण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आमच्या पक्षाच्या कार्यक्रमामुळे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा जळफळाट का व्हावा हे अनाकलनीय आहे. समाजाला पक्षाच्या माध्यमातून काहीतरी बरे द्यावे यासाठी आम्ही वावरत आहोत, असे ते म्हणाले.

सरकारच्या प्रत्येक निर्णयावर विरोधकांनी सातत्याने टीका करणे समजता येते. विरोधकांनी सकारात्मक  टीका केली पाहिजे. जनतेचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. असे करण्याचा लोकशाहीत त्यांना हक्क असला तरी दुसऱ्या पक्षाने कोणते कार्यक्रम राबवावेत, दुसरा पक्ष जनतेसोबत कसा वागतो, जनता व दुसरा पक्ष यांचे नाते कसे आहे यावर टीकीटीप्पणी करण्याचा कॉंग्रेसला अधिकार नाही. लोकशाहीत संघटनात्मक काम वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सरकारी सेवा जेथे पोचत नाही तेथे आमचे कार्यकर्ते पोचतात. पंतप्रधानांचे छायाचित्र लावून वाढदिवसानिमित्त फेरी काढण्यात येणार नाही. दिव्यांगांना उपकरणे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. किराणा मालाचा तुटवडा आहे तेथे किराणा माल पुरवण्यात येणार आहे. युवा वर्ग रक्तदान करणार आहे. अशा समाजोपयोगी कामांवर कॉंग्रेसने टीका करणे अनाठायी आहे.

कोविडमुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जाणार आहे. प्लास्टीकमुक्त गाव,  वृक्षारोपण करावे असे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. आजवर कॉंग्रेसने दिशाभूल कऱण्याचेच सुरु ठेवले आहे.समाजासाठी देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे आमच्या कार्यकर्त्यांना वाटते त्याउलट कॉंग्रेसचे वर्तन आहे अशी टीका त्यांनी केली. उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष महानंद अस्नोडकर म्हणाले, सेवा सप्ताह जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये जळफळाट सुरु झाला आहे. गेल्या सहा महिन्यात भाजपचेच कार्यकर्ते जनतेच्या सेवेत आहेत. त्यापासून बोध न घेता कॉंग्रेस टीका करत आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या