भाजपचे पंतप्रधानांच्या वाढदिनानिमित्त सेवा सप्ताह

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर काळात विविध सामाजिक कार्यक्रमांसह सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. किमान ७० जणांच्या उपस्थितीने हे कार्यक्रम केले जाणार आहे.

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त १४ ते २० सप्टेंबर काळात विविध सामाजिक कार्यक्रमांसह सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. किमान ७० जणांच्या उपस्थितीने हे कार्यक्रम केले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे त्यानिमित्त त्या दिवशी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना तसेच लोकांना समावेश करून आभासी पद्धतीने पोहचविण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. 

पणजीतील भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला पक्षाचे सरचिटणीस दामोदर नाईक व प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते. यावेळी तानावडे म्हणाले की, कोविड महामारीच्या काळात भाजपने राज्यभरात कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियमित सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जून महिन्यात कार्यकर्त्यांच्या आभासी पद्धतीने १६० बैठका आयोजित करण्यात आल्या. येत्या १४ सप्टेंबरपासून सेवा सप्ताहानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये दिव्यांगासाठी गरजू असलेली उपकरणे त्या त्या मतदारसंघात असलेल्यांना दिली जातील. गरीबांना मोफत चेष्म्यांचे वाटप, इस्पितळातील रुग्णांना फळांचे वाटप, याव्यतिरिक्त प्लाझ्मादान व रक्तदान शिबिरे, झाडे लावणे व स्वच्छता अभियान याचा समावेश असेल. या कार्यक्रमांमध्ये भाजपचे नेते व कार्यकर्ते, मंत्री व आमदार आपापल्या मतदारसंघात सामील होणार आहेत. 

येत्या २५ सप्टेंबरला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी केली जाणार आहे. हा जयंतीचा कार्यक्रम सर्व मतदारसंघामध्ये पंडित उपाध्याय यांच्या तसबिरीला पुष्पहार घालून व पुष्प वाहून केला जाणार आहे. या दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र आर्लेकर हे आभासी पद्धतीने संध्याकाळी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांशी संवाद साधणार आहेत. पंडित उपाध्याय यांच्या कार्याची माहिती व त्यांचे विचार मांडणार आहेत. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त स्वदेशी वापर तसेच स्वच्छता मोहीम कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न कार्यक्रमामधून केला जाणार आहे. 

गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याची गरज
मडगाव येथील वाळके खून प्रकरण तसेच हणजूण येथील वखार चालकावर प्राणघातक हल्ला अशा प्रकरणांवरून राज्यात गुंडगिरीचे पर्व सुरू झाले आहे यासंदर्भात विचारले असता प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले की, गुन्हेगारांना भय दिसेल असे वेळीच कंबरडे मोडण्याची गरज आहे. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी २४ तासाच्या आत संशयितांना अटक करण्यात यश मिळवले आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या