Goa Political News : दक्षिणेत लोकसभेची तयारी; भाजपची मोर्चेबांधणी

काँग्रेसची भूमिका अस्पष्ट
BJP
BJPDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

फोंडा : पंचायत निवडणुका झाल्यामुळे आता पुढच्या महत्त्वाच्या म्हणजे 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकडे लोकांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुका या देशाला नवीन दिशा देणाऱ्या निवडणुका ठरू शकत असल्यामुळे आता विविध पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरू झाली आहे. यात भाजप अग्रेसर असून पंचायत निवडणुका म्हणजे लोकसभा निवडणुकीची ‘सेमिफायनल’ असे गृहीत धरून त्याप्रमाणे त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे.

दक्षिण गोव्यातील बहुतेक पंचायतीत भाजपला यश मिळाल्यामुळे त्यांचा हुरूप वाढल्याचे दिसत आहे. फोंडा तालुक्यातील 19 पंचायतींपैकी अधिक पंचायती या भाजपच्या अखत्यारीत आल्यामुळे सध्या भाजपच्या गोटात खुशीचे वातावरण दिसत आहे. ज्यांनी कोणी भाजपच्या समर्थकांविरुद्ध निवडणूक लढवून जिंकली होती, ते सुध्दा आता भाजपच्या वाटेवर असल्याचे बघायला मिळत आहे.

BJP
Ashtami Ferry : पणजीतील अष्टमीच्या फेरीला ग्राहकांची गर्दी

याबाबतीत उसगाव गांजे पंचायतीचे उदाहरण बोलके आहे. या पंचायतीत विश्वजित राणेंचे तीन समर्थकच निवडून आले असले, तरी निवडून आलेले पंच राणेंच्या गोटात गेल्यामुळे ही पंचायत परत एकदा राणेंच्या हातात आली आहे. त्यामुळे सध्या पंचायत पातळीवर तरी भाजपचे ‘बल्ले बल्‍ले’ होत असल्याचे प्रत्ययाला येत आहे.

भाजपच्या उमेदवारीकरिता माजी खासदार नरेंद्र सावईकर यांचे नाव आघाडीवर असून त्यांनाच परत एकदा दक्षिण गोव्याची उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. सावईकर हे फोंडा शहरात राहत असल्यामुळे त्यांना फोंडा तालुक्यातून भरघोस मतदान होणार हे जवळजवळ निश्‍चित आहे. फोंडा, शिरोडा व प्रियोळ या तिन्ही मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार असून ते तिघेजण डॉ. सावंत सरकारात मंत्री आहेत. या पंचायत निवडणुकीत शिरोडा व प्रियोळात भाजपला भरीव यश मिळाले असून फोंडा मतदारसंघातील कुर्टी-खांडेपार या एकमेव पंचायतीत संमिश्र यश प्राप्त झाले आहे.

मडकईत मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांना पूर्वीसारखे निर्भेळ यश मिळाले नसले, तरी त्यांचा ‘वरचष्मा’ परत एकदा प्रतीत झाला आहे. हे पाहता या चारही मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले मतदान प्राप्त होऊ शकते. दक्षिण गोव्यातील पंचायतीचा आढावा घेतल्यास भाजपला बऱ्यापैकी यश प्राप्त झाल्याचे दिसते आहे.

त्यात अग्रेसर ठरले आहे, ते माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर. त्यांना पंचायत निवडणुकीवर आपला शिक्का उमटविला आहे. आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार ॲल्टन डिकॉस्टा यांची डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे केपे मतदारसंघातील बहुतेक पंचायती या कवळेकरांच्या कह्यात आल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे दक्षिण गोव्याच्या भाजप उमेदवारीकरिता कवळेकरांचे नाव घेतले जात आहे. पण एकंदरीत चित्र पाहता याबाबतीत सावईकरांचे पारडे जड ठरू शकते.

चर्चिल आलेमाव रिंगणात उतरणार

काँग्रेसने अजून आपले पत्ते खोलले नसले तरी कुठ्ठाळीचे काँग्रेसचे उमेदवार व्हेरियातो फर्नांडिस यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनीही रणशिंग फुंकले असून ते कोणत्या पक्षातर्फे निवडणुकीत उतरणार हे अजून स्पष्ट झाले नाही. तरीसुद्धा ते काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ठरू शकतात असाही होरा व्यक्त केला जात आहे. याशिवाय काँग्रेसचे इतर उमेदवारही असू शकतात.

भाजपचा पोळी भाजण्याचा प्रयत्न

‘घर घर चलो तिरंगा’ मोहिमेत सुध्दा अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणूकीला ‘प्रोजेक्ट’ करण्यात येत होते. भाजपने आतापासूनच लोकसभा निवडणुकीला गांभीर्याने घेतल्याचे संकेत मिळत आहेत. पंचायत निवडणुकीच्या यशाच्या तव्यावर ते लोकसभा निवडणुकीची पोळी भाजण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हे एव्हाना दिसायला लागली आहेत. पंचायत निवडणुका व राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका यात फरक असला तरी भाजपचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com