भाजपचे कोविडसंदर्भातील ई-पुस्तिकेचे प्रकाशन; लोकांपुढे ठेवला कोरोना काळातील कामगिरीचा दस्तावेज

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सरकारसोबत कोविड महामारीच्या काळात बिगर सरकारी संस्था, इतर पक्ष काम करत होते. काहीजण हेल्मेट व शिल्ड वापरून घरात बसून शहाणपणा शिकवत होते. भाजपचे कार्यकर्ते मात्र जनतेसोबत वावरत होते.

पणजी: कोविड महामारीचा सामना राज्याने कसा केला याचा दस्तावेज सरकारी पातळीवर तयार केला आहे. त्यातून यापुढे अशी महामारी आली, तर ती कशी हाताळायची याचे मार्गदर्शन निश्चितच मिळणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे नमूद केले.

भाजपच्या राज्य मुख्यालयात आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामाची दखल घेणाऱ्या ई दस्तावेजाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, सरकारसोबत कोविड महामारीच्या काळात बिगर सरकारी संस्था, इतर पक्ष काम करत होते. काहीजण हेल्मेट व शिल्ड वापरून घरात बसून शहाणपणा शिकवत होते. भाजपचे कार्यकर्ते मात्र जनतेसोबत वावरत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, मला व आमच्या इतर आमदारांना कोविडची लागण झाली. कारण आम्ही जनतेत वावरत होतो.

२२ मार्चपासून भाजपचे कार्यकर्ते वावरत आहेत. पंच, सरपंच, कार्यकर्ते यांना कोविडची लागण यातूनच झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाबरून न जाता कोविड महामारीच्या काळात जनतेला सेवा दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कोविड योद्ध्यासारखे ते वावरले. याची नोंद घेत दस्तावेज तयार करणे आवश्यक होते. ते काम आज केले आहे. आमच्यापैकी कोणी बेजबाबदार वागले नाही. कोविडची लागण झालेल्यांच्या संपर्कात आल्याने कोविडची लागण झाली. दस्तावेज आज तयार केला त्याचा उपयोग भविष्यात होणार आहे. याकाळात वावरलेल्या भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन. पक्षीय पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करून संघटन शक्ती दाखवून दिली. केवळ गोमंतकीयांचीच सेवा नव्हे, तर परराज्यातील पण येथे अडकलेल्यांना त्यांच्या घरी पाठवणे, 

निवारा केंद्रात त्यांची सोय करणे यासाठीही कार्यकर्ते वावरले आहेत. त्या काळात विविध राज्यांतून दूरध्वनी येत होते ते पक्षीय पातळीवर हाताळून दिलासा देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, ई पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उपलब्ध नसल्याने थोडा वेळ पुढे ढकलावे लागले आहे. २५ मार्च ते ३० मे या ६८ दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात भाजपचे कार्यकर्ते सेवा हेच संघटन ही संकल्पना घेऊन जनतेच्या सेवेसाठी वावरले. गरजवंतांपर्यंत भाजपने मदत पोचवली. किराणा माल, शिजवलेले अन्नही कार्यकर्त्यांनी पोचवले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या