Goa BJP: अबब! शंभर कोटींची मानहानी? 'खरी कुजबूज'

Goa BJP: सासष्टीतील एका खासगी शाळेत शिक्षक भरती प्रकरणी भाजपाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला आणि त्याच शाळेच्या माजी समितीत वाद सुरू आहे.
Goa News | Khari KujBuj
Goa News | Khari KujBuj Dainik Gomantak

Goa BJP: ‘जिभेक हाड ना म्हणून कितेय उलोंवक जायना’ अशी कोकणीत एक म्हण आहे. काही लोक विनाकारण इतरांवर नाहक आरोप करतात. सासष्टीतील एका खासगी शाळेत शिक्षक भरती प्रकरणी भाजपाचे प्रवक्ते उर्फान मुल्ला व त्याच शाळेच्या माजी समितीत वाद सुरू आहे. त्या शाळेच्या पूर्वीच्या व्यवस्थापन समितीने मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

आता उर्फान मुल्लाने म्हणे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. उर्फान म्हणतात, आरोप करणारे माजी समितीचे अध्यक्ष सायकल चोर आहेत. आता उर्फान भाई, सायकल चोर शंभर कोटी कोठून आणणार? व्यवस्थापन समितीच्या या भांडणाचा शाळेवर परिणाम होतोय हे मात्र नक्की.

एसटीपी प्रक्रिया प्रकल्पाचे भिजत घोंगडे

राज्यातील मलनिस्सारण अर्थातच एसटीपी प्रक्रिया प्रकल्पाचे भिजत घोंगडे सध्या अनेक ठिकाणी मारक ठरले आहे. या एसटीपी प्रकल्पाचे काम सुरू करताना घिसाडघाई झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच या खात्याच्या अधिकाऱ्यांनी कसेबसे काम पुढे रेटण्यासाठी घाई केल्यामुळेच तर आता अनेक ठिकाणाहून विरोध होत आहे.

वास्तविक हा प्रकल्प आवश्‍यक आहे, पण ज्या पद्धतीने हे काम या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित कंत्राटदाराने हाताळले, त्यामुळेच लोकांत चीड आहे. खड्डे खणले तर व्यवस्थित बुजवण्यास वेळकाढू धोरण अवलंबणे, खणलेले खड्डे बुजवल्यानंतर पुन्हा खचणे असे प्रकार झाले असल्याने आता लोकच या प्रकल्पाबद्दल आणि अधिकाऱ्यांबरोबरच संबंधित कंत्राटदारावर संशय घ्यायला लागले आहेत.

‘बाबा का बुलावा आया है..!’

गोव्यात सध्या शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची कमी नाही. महिन्यातून एकदा शिर्डीला जाणाऱ्यांची संख्या सध्या वाढली आहे. म्हणजेच शिर्डीचा साईबाबा त्यांना पावला असेच म्हणावे लागेल. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हेही काही सहकाऱ्यांसमवेत साईबाबांच्या दर्शनाला जाऊन आले. त्यांच्याबरोबर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये हेसुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते.

आता पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हेही शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाऊन आले. साईबाबांच्या दर्शनाला गेल्याचे पुरावे म्हणून ही मंडळी समाज माध्यमांतून छायाचित्रे सामाईक करतात. यापूर्वी साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे पाहायला मिळायची. आता आमदारही जाऊ लागल्याचे दर्शन होऊ लागले आहे. त्यात वेगळेपण काही नसले, तरी ‘बाबा का बुलावा आया है...’ म्हणणाऱ्यांची संख्या वाढतेय एवढे नक्की.

ज्याचे काम त्याने करावे!

सर्दी व खोकला झाल्यास आपण डॉक्टरकडे जातो. अभियंत्याकडे नाही! रुग्णावर डॉक्टराऐवजी अभियंत्याने उपचार केल्यास गोळीच्या जागी भलतेच काही देईल. त्यामुळे ज्याचे काम त्यानेच करावे, तरच ते योग्यरीत्या होते. परंतु हा तर्क सध्या गोव्यात लागू होत असल्याचे दिसत नाही. राज्यातील नदी आणि जेटी बंदर कप्तान खात्याच्‍या अखत्यारित येत असून त्यासंबंधी व्यवहार तेच पाहतात. आता नवीन जेटी धोरणानुसार पर्यटन खात्याकडे अनेक गोष्टी जाणार आहेत. हे तर आरोग्य खात्याला पुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी देण्यासारखे झाले. ∙∙∙

पोलिसांनाही टार्गेट?

‘बेग, बॉंरो ऑर स्टील’ म्हणजे ‘भीक मागा, उदार मागा किंवा चोरून आणा’ अशा अर्थाची एक म्हण आहे. आपल्या खाकी वर्दीतील पोलिस व वाहतूक खात्याला सरकारकडून असेच आदेश मिळाले आहेत का? असा प्रश्न आम जनतेला पडणे स्वाभाविक. पोलिस, वाहतूक पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना वाहनचालकांकडून तालांव गोळा करण्याचे टार्गेट मिळते असे आम्ही नव्हे काही पोलिस अधिकारीच सांगतात.

कायदा व सुव्यवस्था राखण्यास नेमलेले पोलिस वाहतूक व्यवस्थेसाठी ठेवलेले वाहतूक पोलिस व आरटीओ सगळेच वाहनचालकांना तालांव देण्यासाठी व्यस्त असतात. त्यांच्यासाठी वाहनचालक म्हणजे पैसे गोळा करण्याचे चांगले स्रोत असतात. म्हणूनच लपून छपून दबा धरून हे माय बाप खाकी वर्दीवाले आपले टार्गेट पूर्ण करतात.

ज्याप्रमाणे मल्टीनॅशनल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना उत्पादन आणि व्यवसायाचे टार्गेट असते तसेच टार्गेट पोलिसांनाही दिले जाते असे पोलिसच सांगू लागले आहेत. एक मात्र खरे जर सगळे वाहनचालक शिस्तीने वागले, तर नुकसान सरकारचेच आहे. आता सरकारची तिजोरी भरलेली बरी की वाहतूक शिस्तीचे पालन केलेले बरे हे आता ज्याचे त्याने ठरवावे.

नगरसेवक हिरमुसले

म्हापसा पालिका सध्या विविध गोष्टींमुळे चर्चेत आहे, अशातच सत्ताधारी नगरसेवकांची शिर्डी ट्रीप गाजली! याविषयी बातम्या आल्याने नगरसेवक हिरमुसले. याबाबतचे वृत्तसुद्धा माध्यमांनी प्रसिद्ध केल्याने तीही बाब या नगरसेवकांना रुचली नाही. त्यामुळे तुम्हाला यापुढे काही सांगायचे नाही असे हे नगरसेवक बोलून दाखवत आहेत.

माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर काहीही बोलल्यास तुम्ही त्याची बातमी व राईचा पर्वत करता असे हे महाशय आता बोलू लागले आहेत! आता पत्रकारांसमोर समोर यापुढे काहीही न बोलण्याची जणू शपथच या लोकांनी घेतली आहे! त्यामुळे येणाऱ्या काळात या सत्ताधाऱ्यांची भूमिका व वागणे कसे असेल हे पाहूया!

किरणरावांची ‘लो प्रोफाईल लाईफ’

थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी तृणमूल काँग्रेस सोडल्यापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत ते ‘फेवरेट’ म्हणून उतरले होते, परंतु अखेर त्यांचा पराभव झाला आणि थिवी व हळदोणे या दोन्ही जागा हातातून निसटल्या. पराभवाचा परिणाम त्यांच्यात झाल्याचे दिसत असून ते ‘लो प्रोफाईल लाईफ’ म्हणजे साधेपणाने जगू लागले आहेत. हल्लीच पणजीतील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये किरणराव आपल्या टीमसोबत चहा घेताना दिसले. भरलेल्या कॅफेमध्ये ते राजकारण्यासारखे नाही, तर सर्वसामान्यांप्रमाणेच होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com