गोवा काँग्रेस अध्यक्षांचे भाजपसमर्थक नगराध्यक्षांना आवाहन

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

हिम्मत असल्यास त्या तिघांनीही जाहीर चर्चेस पुढे यावे, असे जाहीर आव्हान उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी दिले आहे.

म्हापसा: म्हापसा पालिका मंडळावर मागच्या कार्यकाळात नगराध्यक्षपदी कार्यरत राहिलेले संदीप फळारी, रोहन कवळेकर व रायन ब्रागांझा अशा तीनही भाजपसमर्थक नगराध्यक्षांनी म्हापशाच्या विकासासाठी ठोस असे काहीच केले नाही, असा दावा करून हिम्मत असल्यास त्या तिघांनीही जाहीर चर्चेस पुढे यावे, असे जाहीर आव्हान उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी दिले आहे.

म्हापसा येथे पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. भिके पुढे म्हणाले, कोट्यवधी खर्च दाखवू्न म्हापसा शहरात नाममात्र स्वरूपात छोटेखानी कामे करणे, पेव्हर्स घालणे म्हणजे म्हापशाचा विकास नव्हे. असे करून त्यांनी म्हापसावासीयांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. शासकीय पैसा उधळून अर्थांत लाखभराच्या कामांवर कोट्यवधींचा खर्च करून शहराचे किंचित सौंदर्यीकरण करणे व त्याबाबत विकासाच्या बाता मारणे गैर आहे. हे सारे घडूनही भाजपाच्या आमदाराच्या मागे मागे धावणाऱ्या त्या माजी नगरसेवकांनी हा सारा प्रकार अंधपणे पाहणे, यात काहीतरी काळेबेरे आहे हे स्पष्टपणे दिसून येते, असेही ते म्हणाले.

श्री. भिके म्हणाले, म्हापसा शहराला नेहमीच सतावणारा पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यात ते सर्व भाजपासमर्थक माजी नगरसेवक असमर्थ ठरले असून, त्यांनी जनतेच्या हिताबाबत काहीच देणेघेणे नाही. आतापर्यंत त्यांनी स्वहित साधण्यासाठी भाजपचे माजी आमदार फ्रांसिस डिसोझा व आता ज्योशुआ डिसोझा यांची पाठराखण करण्यातच धन्यता मानली आहे, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा:

देशातील दुसरे ‘फिलाटेलिक’ संग्रहालय राजधानी दिल्लीनंतर गोव्यात साकारणार -

संबंधित बातम्या