गोवा भाजपची असंवेदनशीलता उघड - दिगंबर कामत

kamat goa 1.jpg
kamat goa 1.jpg

पणजी: गोव्यात भाजप (Goa BJP) सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 2 हजार 700 लोकांचा कोविडने बळी घेतला. ऑक्सिजनचा (oxygen) पुरवठा बंद करुन सरकारने लोकांचे जीव घेतले. सरकारच्या नाकर्तेपणाने मृत्यु आलेल्या शोकाकुल कुटुंबियांवर घरी समई व मेणबत्त्या पेटवण्याचा प्रसंग आलेला असताना, भाजप सरकारचे मंत्री व पक्षाचे पदाधिकारी दीपप्रज्वलन करुन टीका उत्सव साजरे करतात यावरुन त्यांची असंवेदनशीलता दिसते, अशी घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत(Digambar Kamat) यांनी केपे येथे केली आहे.

केपे गट युवक कॉंग्रेसच्या (Youth Congress) अधिकारग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस सुभाष फळदेसाई, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, एल्टन डिकॉस्ता, उबेद खान, मेल्वीन कार्वाल्हो, प्रशांत वेळीप व ॲड. अर्चित नाईक उपस्थित होते. 

केपे मतदारसंघातील नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील सुमारे 350 युवकांतर्फे आज सुमारे 30 जणांनी कोविडची बंधने असल्याने प्रातिनिधीक स्वरुपात युवक कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गोवा युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मागील एक महिना कसलीच जाहिरातबाजी न करता शेकडो कोविड रुग्णांना (Covid patients) ऑक्सिजन पुरवठा तसेच इतर मदत करुन लोकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केले आहे. फोटो काढुन प्रसिद्धी घेण्यापेक्षा आमच्या कार्यकर्त्यांसाठी लोकांचे आशिर्वाद जास्त मोलाचे आहेत हे युवक कॉंग्रेसने सिद्ध केले असे दिगंबर कामत म्हणाले. युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या  बळावर आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत कॉंग्रेसचा झेंडा फडकेल याचा मला पुर्ण विश्वास असल्याचे कामत यांनी उपस्थितांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.

भाजप सरकारने आज कोविडच्या संसर्गाने मरण आलेल्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मृताच्या नातेवाईकासाठी चार लाख व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकी दोन लाख देण्याची घोषणा केली आहे. युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी कोविडने मृ्त्यु आलेल्या कुटुंबियांना एकुण सहा लाख रुपये सरकारकडुन मिळवून देण्यास संपूर्ण मदत करावी असे आवाहन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना केले. 

कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी करुन केपेतील मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या उप- मुख्यमंत्री बाबू कवळेकरांना स्वाभिमानी केपेकर धडा शिकविण्यासाठी सज्ज असुन, सत्तेत असुनही मागील जिल्हा पंचायत व नगरपालीका निवडणूकांत बाबू कवळेकरांच्या समर्थकांची एकुण टक्केवारी जबरदस्त घटल्याने बाबूंचे वजन कमी झाल्याचे सिद्ध झाले आहे. संधिसाधू बाबू कवळेकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवीण्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकी राखुन काम करावे असे गिरीश चोडणकर म्हणाले.

कॉंग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत केपेत एक नवा इतिहास रचणार असुन, कॉंग्रेस सोडून भाजपात केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी गेलेल्यांना केपेकर अद्दल घडविणार आहेत असे ॲल्टन डिकॉस्ता यांनी यावेळी बोलताना सांगितले.  युवक कॉंग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी सर्व नविन सदस्यांना स्थानिक विषय घेवुन जनतेला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. कोविड महामारीत युवक कॉंग्रेसने केलेल्या कामाने जनता आज आमच्याकडे विश्वासाने पाहत असुन, लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे असे ते म्हणाले.

नवनिर्वाचीत केपे युवक कॉंग्रेस अध्यक्ष प्रशांत वेळीप यांनी यावेळी बोलताना ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसचे कार्य पुढे नेणार असल्याचे सांगितले व युवक कॉंग्रेसची एक मोठी फळी उभी करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. आज प्रातिनिधीक स्वरुपात सदस्य झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामागे किमान दहा युवक कार्यकर्ते असल्याचे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अर्चित नाईक यांनी केले. सुरूवातीला कोविडने मृत्यु आलेल्यांप्रती शांतता पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com