गोव्याची सीमा बंदच; नोकरीनिमित्त दररोज ये- जा करणाऱ्यांची गैरसोय

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

कर्नाटक राज्‍याच्‍या आपल्‍या सीमा खुल्‍या केल्‍या, तरीही गोव्‍यातील पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा, पोळे, केरी येथील सीमा बंदच आहेत.

बांदा: कोविड महामारीमुळे राज्‍याच्‍या सीमा बंद करण्‍यात आल्‍या. २४ मार्चपासून लागू केलेल्‍या टाळेबंदीला आता पाच महिने लोटले तरीही सीमा खुल्‍या झाल्‍या नसल्‍याने सीमावर्ती भागातील लोकांची व चाकरमान्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कर्नाटक राज्‍याच्‍या आपल्‍या सीमा खुल्‍या केल्‍या, तरीही गोव्‍यातील पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा, पोळे, केरी येथील सीमा बंदच आहेत. केंद्राची कोविड मार्गदर्शक सूचना एकच असली, तरीही त्‍यात भेदभाव का? तसेच प्रवेश करणाऱ्यांना प्रत्‍येकी दोन हजार रुपये तपासणी शुल्‍क घेत असल्‍याने नाराजी व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

गोव्‍याच्‍या सीमा बंद केल्‍यानंतर वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग तालुक्‍यातील नोकरीनिमित्त गोव्‍यात दररोज ये- जा करणाऱ्यांची गैरसोय झाली. काहीजणांच्‍या नोकऱ्या गेल्‍या, तर काहीजण गोव्‍यातच अडकून राहिले. नोकरी सांभाळली नाही, तर बेरोजगार होण्‍याची वेळ येईल, या भीतीपोटी काहीजण अर्ध्या पगारावर वेळ निभावून नेत आहेत. काहीजणांनी नोकरीच्‍या बळावर कर्ज घेतले. टाळेबंदीच्‍या काळात पगारात कपात केल्‍याने आर्थिक स्रोतच नष्‍ट झाल्‍याने सुमारे ८० टक्क्‍यांपेक्षा अधिक कुटुंबे संकटात सापडली आहेत. 

गाव गाठता येईना...
केंद्र सरकारने कोविड महामारीच्‍या काळात भाड्याने राहणाऱ्यांना दिलासा द्यावा. त्‍यांच्‍याकडून भाडे घेऊ नये, अशा सूचना केल्‍या होत्‍या. मात्र, घरमालक, फ्‍लॅटमालक आपले पैसे वसूल करण्‍यासाठी तगादा लावत आहे. आधीच कठीण परिस्‍थिती, त्‍यात आर्थिक गणित कोलमडले, अशा परिस्‍थितीत भाडे कसे देणार? कुटुंबाचा खर्च कसा पेलवणार? असे अनेक प्रश्‍न कुटुंबप्रमुखांना भेडसावत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कंपनी व्‍यवस्‍थापनांनी कामगार कपात केल्‍याने आधीच संकट कोसळले, त्‍यात गाव कसे गाठणार? अशा संकटात बरेचजण अडकले आहेत. घरी गेल्‍यास काहीतरी मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविता येईल, अशी धारणा काहीजणांची झाली आहे. परिस्‍थिती निवळल्‍यावर नोकरीचे बघू, असे बऱ्याचजणांना वाटते. राज्‍याच्‍या सीमा खुल्‍या झाल्‍यावर तूर्त आलेले संकट काहीप्रमाणात टाळता येईल, अशा प्रतिक्रिया सीमावर्ती भागातील नोकरीनिमित्त असणाऱ्यांकडून व्‍यक्त होत आहेत. गोव्‍याच्‍या लगत असलेल्‍या बांदा, शिरोडा, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग या बाजारपेठेत खरेदी करण्‍यासाठी गोमंतकीय लोक मोठ्या प्रमाणात जात असतात. मागील पाच महिन्‍यांपासून अत्‍यावश्‍‍यक साहित्‍याची बेगमी करण्‍यासाठी या बाजारपेठेत किफायतशीर वस्‍तू मिळत असल्‍याने लोकांना अतिरिक्त दराने खरेदी करण्‍यावाचून पर्याय नाही. सीमा खुल्‍या झाल्‍यावर लोकांना वस्‍तू खरेदी व बाजारहाट करणे सोयीस्‍कर होईल, असेही काहीजणांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या