१६१ दिवसांनी गोव्याच्या सीमा खुल्या

अवित बगळे
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

गोव्याच्या सीमा खुल्या कराव्यात अशी मागणी कारवार, बेळगाव आणि सिंधुदुर्गातून केली जात असे. पोळे सिमेवर कारवारवासियांनी यासाठी रास्ता रोको आंदोलनही केले होते.

पणजी

अखेर गोव्याच्या सीमा १६१ दिवसांनी उद्यापासून (ता.१) खुल्या होणार आहेत. आज राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले की राज्यात रस्ता, रेल्वे व हवाईमार्गे येणाऱ्या व्यक्तीला आरोग्य चाचणीची सक्ती केली जाऊ नये. केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशाला (रस्ता, रेल्वे, हवाईमार्गे) आरोग्य चाचणीची सक्ती असेल. बार, स्पा व मसाज पार्लर उद्यापासून (ता.१) खुले केले जातील. कसिनो व जलविहार यांच्‍यावरील बंदी कायम असेल असेही या बैठकीत ठरवण्यात आले आहे.
या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गोवा राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या केल्या जातील. राज्यातील बारही उद्यापासून सुरु केले जातील, अशी माहिती देऊन ते म्हणाले, गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केली जाणार नाही असे ते म्हणाले. शाळा सुरु करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, २१ सप्टेंबरनंतर ,त्याविषयी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या गोव्यात येताना कोविडची लागण झाली नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे ४८ तास आधी घेतलेले प्रमाणपत्र आणण्याची सक्ती होती. अन्यथा सिमेवर दोन हजार रुपये शुल्क भरून कोविड चाचणी करून घ्यायची किंवा १४ दिवस गृह अलगीकरणात राहण्याचा पर्याय स्वीकारावा लागत होता. गोव्यात रोजगारासाठी कारवार आणि सिंधुदुर्गातून दररोज शेकडोजण ये जा करतात. त्यांच्याकडून सीमा खुल्या करण्याची मागणी करण्यात येत होती. गोव्यात जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू रोखू असा इशाराही त्यांच्याकडून दिला जात असे. भाजीपाला, दूध, अंडी, कोंबडी यासाठी गोवा शेजारील राज्यांवर अवलंबून आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्‍य सचिव नीला मोहनन यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांकडून कोविड महामारी व्यवस्थापनाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील चार कक्ष हे कोविड व्‍यवस्थापनासाठी वापरले जात आहेत. कोविड रुग्णांवर आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रीया करण्यात येत असून आजवर नऊ जणांवर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. कोविड इस्पितळातील २१० खाटा भरल्या असून, फोंडा येथे कोविड रुग्ण पाठवणे आजपासून सुरु करण्यात आले आहे. काही उपकरणे घ्यायची आहे, त्यांची खरेदी सुरु आहेत. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात काही उपकरणे बसवण्यात येतील. आरोग्य सेवा संचालनात हमीपत्रावर काम करणारे डॉक्टर यापुढे कोविड व्यवस्थापनासाठी काम करणार आहेत.
ते म्हणाले, आजवर १८० जणांनी कोविड महामारीच्या काळात प्राण गमावले आहेत. त्याचे विश्लेषण कऱण्यात येत आहे. किती जणांना मरण पावल्यानंतर इस्पितळात आणण्यात आले आणि त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर कोविडची लागण दिसून आली, किती जणांना इतर आजार होते त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याची माहिती घेतली जात आहे. २४ तासात किती जणांचा मृत्यू झाला ही माहितीही संकलीत केली जात आहे.
ते म्हणाले, गणेशोत्सवामुळे कोविड महामारीच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे मी म्हटलेले नव्हते. मी गणेशोत्सवाच्या काळात जनतेने समाज अंतर पाळले नाही, मुखावरणे वापरली नाहीत, दाटीवाटीने लोक उत्सवात सहभागी झाले, त्यांनी शिस्त न पाळल्याने रुग्णसंख्या वाढली असे म्हटले होते. उत्सवामुळे रुग्ण वाढले नसून लोकांच्या बेशिस्तीमुळे रुग्ण वाढले असे मी नमूद केले होते. माझ्या विधानाचा विरोधी कॉंग्रेस पक्ष विपर्यास करत आहे. मी त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून केवळ वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. जे सत्य आहे तेच मी बोललो आहे.
कोविड महामारीच्या काळात जराही लक्षणे दिसली की जनतेने तपासणी करून घ्यावी. लक्षणे बळावेपर्यंत थांबू नये असे आवाहन करून ते म्हणाले, वेळीच उपचार घेतले तर कोविडच्या लागणीतून बरे होता येते हे नव्वद वर्षाच्या ज्येष्ठ नागरीकांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोविडची लागण झालेल्या सात मातांनी मुलांना सुरक्षित जन्म दिला त्यासाठी सिझेरीयन शस्त्रक्रीया केल्‍या गेल्या आहेत. कोविडची लागण झालेल्या ५० माता नैसर्गिकरीत्या प्रसुत झाल्या. त्या सर्वांची बालके सुरक्षित आहेत. बऱ्याच माता व बालके आपल्या घरीही पोचली आहेत. मुत्रपिंड निकामी झालेले काही रुग्ण कोविडमधून बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार सुरु करणे आवश्यक आहेत.

संबंधित बातम्या