Goa Budget 2021: म्हादई प्रकरणी सरकारवर आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी घेतले तोंडसुख

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवल्याप्रकरणी सरकारवर आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना तोंडसुख घेतले. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ अशी उक्ती आहे.

पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवल्याप्रकरणी सरकारवर आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना तोंडसुख घेतले. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ अशी उक्ती आहे. मात्र, सरकारचा भाग असताना एक भूमिका आणि सरकारचा भाग नसताना दुसरी भूमिका अशा प्रकारचे धरसोड वृत्तीचे राजकारण करणे राज्याच्या भविष्यासाठी घातक आहे, असे त्यांनी नमूद केले.

म्हादई या विषयावर राजकारण करणे बंद केले पाहिजे आणि आम्ही सर्वजण एका निर्धाराने एकत्र आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी सांगितले सरकारला या विषयाचे गांभीर्य माहिती आहे, नदीचा प्रवाह चुकीच्या पद्धतीने बदलण्याच्या शेजारी राज्याच्या कृतीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करण्यात आले आहे. लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संदर्भात सरकारने वेगळी अवमान याचिकाही दाखल केलेली आहे, त्याचा परिणाम म्हणून तीन राज्यांचे प्रतिनिधी असलेल्या समितीने पाहणी केली आहे आणि चार आठवड्यात ही समिती सर्वोच्च न्यायालयाला आपला अहवाल देणार आहे.या शिवाय नदीच्या पात्राची पाहणी सुरू झाली असून त्याचा अहवाल मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मिळणार आहे. या सर्व बाजू राज्याच्या जमेच्या आहेत.

गोवा विधानसभेचे जेष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण 

गिरीत15 दशलक्ष लिटर्स पाणी उपसा केंद्र लवकरच
राज्यातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी गिरी येथे 15 दशलक्ष लिटर्स प्रतिदिन क्षमतेचे उपसा केंद्र लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. तेथून पर्वरीला पाणी नेले जाणार आहे. खांडेपार नदीवर बंधारा बांधण्यात येत असून त्याचे पाणी केरी आणि सावईवेरे या गावांना पुरवले जाणार आहे. यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिसवाडी आणि फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी गांजे येथे एक बंधारा बांधून त्याचे उपसा केंद्रही सुरू केले जाणार आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ओपा येथील जलशुद्धिकरण प्रकल्पात हे पाणी पुरवले जाणार आहे.

Goa Budget 2021: आर्थिक शिस्तीत कोटींची उड्डाणे 

जलधोरणात होणार बदल
राज्यातील तळी, विहिरी, उपनद्या तलाव झरे भविष्यात कोणी बुजवून नयेत यासाठी या संपदेचे सर्वेक्षण करून ‘क्यू आर’ कोडसह त्यांचा नकाशा तयार करण्यात येत आहे. सध्याच्या राज्य जलधोरणात आता बदल केला जाणार आहे. यामध्ये जल पर्यावरण आणि जलसंवर्धन या संकल्पना समाविष्ट केल्या जाणार आहेत. यंदा साळावली अंजुणे आणि तिळारी या धरणातील गाळ काढला जाणार आहे. यामुळे या धरणांची जलधारण क्षमता वाढणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय वादळ जोखीम प्रकल्पांतर्गत चिखली पैंगीण, श्रीस्थळ नगर्से, शिवोली पेन्ह द फ्रान्स , मांद्रे, आल्तिनो, सांकवाळ येथे निवारा केंद्रे उभारण्यात येत आहेत तालुक्याला अखंडित पाणीपुरवठा व्हावा यासाठी तिळारी धरणापासून ते वीस किलोमीटरची मोठी जलवाहिनी १२२ कोटी रुपये खर्चून घालण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रासोबतही संयुक्त बैठक घेऊन त्यांनी त्यास मान्यता दिलेली आहे.

संबंधित बातम्या