Goa Budget 2021: गोवा अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

गोव्याचा अर्थसंकल्प यंदा 24 मार्च रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा विधानसभेचे बारा दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून सुरू होणार आहे

पणजी: गोव्याचा अर्थसंकल्प यंदा 24 मार्च रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा विधानसभेचे बारा दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दुपारी अडीच वाजता वित्त मंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील. गेली चार वर्षे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखानुदान मंजूर करून घेऊन पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा व मंजुरी घेतली जात असे यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनातच अर्थसंकल्प मंजूर करू असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. गोव्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेवर भर दिलेला असेल. गोवा सरकारने गेल्या वर्षी एक ऑक्टोबर पासून स्वयंपूर्ण गोवा ही मोहीम राबवणे सुरू केलेले आहे.

गावच्या गरजा गावातच भागल्या पाहिजेत आणि राज्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी शेजारील राज्यांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी उत्पादनात वाढ करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्या अर्थसंकल्प पूर्व बैठकांना सुरुवात केली आहे.  विविध सामाजिक संघटना, उद्योजकांच्या संघटना,कामगार नेते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सूचना व मते ऐकून घेतली जात आहेत.मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षात खातेनिहाय खर्चाचा आढावा घेतलेला आहे. अर्थसंकल्पाचा किती भाग विनाखर्च राहतो यावर त्यांनी भर दिलेला आहे. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात खर्च करणाऱ्या खात्यांना भरीव तरतूद असेल असे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या