Goa Budget 2021: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत समुपदेशन
Goa Budget 2021 The Goa state government has allocated Rs 3038 crore for the education department in the budget

Goa Budget 2021: दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत समुपदेशन

पणजी : राज्य सरकारने अर्थसंकल्पात शिक्षण खात्यासाठी 3 हजार 38 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना त्यांचा कल समजावून सांगण्यासाठी त्यांना मोफत समुपदेशन करण्याची व्यवस्था केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची क्षमता शिक्षकांवर वाढीस लागावी, यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. आता हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सरकारी शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा सुरू केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यात तर्कसंगत विचार करण्याची पद्धती रुजावी आणि कोडींगद्वारे त्यांना माहिती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री कोडींग आणि रोबोटिक्स योजनेंतर्गत प्रयोगशाळा माध्यमिक स्तरावर सुरू केल्या जातील, यासाठी यंदा 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

गोवा कला संस्कृती तसेच ज्ञान-विज्ञानाचे केंद्र व्हावे, यासाठी सरकारने काही अध्यासने सुरू करण्याचे ठरवले आहे व विद्यापीठात समाजशास्त्र विषय यात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन सुरू केले जाणार आहे. गोवा कॉलेज ऑफ थिएटर आर्ट येथे नाट्य कला विषयाचे विष्णू सूर्या वाघ अध्यासन गोवा संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे पंडित जितेंद्र अभिषेकी अध्यासन आणि गोवा कला महाविद्यालयात आधुनिक कला विषयावर लक्ष्मण पै अध्यासन सुरू केले जाणार आहे, यासाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पात केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

राज्यात तीन खासगी विद्यापीठे सुरू होणार असल्याची माहिती देऊन त्यांनी सांगितले गोवा स्थापत्यशास्त्र महाविद्यालयासाठी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे, तसेच गोवा औषधशास्त्र महाविद्यालयासाठी ही नवीन इमारत बांधली जाणार आहे. बुवा कला महाविद्यालयासाठी विस्तारित इमारत बांधली जाईल. गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी स्थापत्यशास्त्रातील दोन पदवीत्तर पदवी अभ्यासक्रम आणि फाइन आर्ट्स मधील दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com