‘कोविड योद्ध्यां’ची भरती लवकरच

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

‘कोविड’ महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती सुरूच ठेवली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोविड कक्ष सुरू केल्याने तेथे कंत्राटी पद्धतीने १९ परिचारीका, ३० सहाय्‍यक, ५ कनिष्ठ लिपिक आणि १० कनिष्ठ तंत्रज्ञ, ८५ बहुउद्देशीय कर्मचारी नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

पणजी: ‘कोविड’ महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती सुरूच ठेवली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोविड कक्ष सुरू केल्याने तेथे कंत्राटी पद्धतीने १९ परिचारीका, ३० सहाय्‍यक, ५ कनिष्ठ लिपिक आणि १० कनिष्ठ तंत्रज्ञ, ८५ बहुउद्देशीय कर्मचारी नेमण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मडगाव येथील नव्या कोविड इस्पितळात नियुक्त करण्यासाठी सहा परिचारीका आणि चार सहायक यांच्या नियुक्तीसही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाने खर्च केलेल्या १२ कोटी रुपयांना कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली.  वेर्णा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या महामार्ग रुंदीकरणासंदर्भात केलेल्या कामासही कार्योत्तर मंजुरी देण्यात आल्‍याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्राल उपस्थित होते.

‘संजीवनी’ आता कृषी खात्‍याकडे
धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना सहकार खात्याकडून आता कृषी खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाचे काही कर्मचारी गोवा लोकसेवा आयोगात काम करतात, त्यांना सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे. गोवा इन्फोटेक महामंडळाचे काही कर्मचारी कोविड विरोधातील लढ्यात काम करतात. त्यांच्या कंत्राटात वर्षाची वाढ केली आहे. स्पार्क या केंद्राच्या योजनेखाली निधी मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. केवळ चार राज्यांनाच हा लाभ केंद्र सरकार देणार आहे. यासाठी राज्य सरकारने सल्लागार नेमला आहे. वेर्णा येथे हा प्रकल्प करण्याचा मानस आहे. कोकण रेल्वेच्या निधीतून बाळ्ळी येथे २२० केव्हीएचे वीज उपकेंद्र उभारण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या