राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राजधानी पणजीत रंगरंगोटी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 डिसेंबर 2020

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानीत रंगरंगोटीची कामे पाहायला मिळत आहेत, परंतु ही रंगरंगोटी महोत्सवासाठी नव्हे, तर राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गोवा दौऱ्यामुळे चालली आहे.

पणजी : नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानीत रंगरंगोटीची कामे पाहायला मिळत आहेत, परंतु ही रंगरंगोटी महोत्सवासाठी नव्हे, तर राष्‍ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या गोवा दौऱ्यामुळे चालली आहे. त्यासाठी अनेक वर्षांपासून बंद असलेली सिग्नल सेवाही सुरू करण्यासाठी पोलिसांची वाहतूक शाखा कामाला लागली आहे. 

 

राष्ट्रपती गोवा राज्याच्या ६० व्या मुक्तीदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी राजधानी सध्या चकाचक करण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने ठिकठिकाणी पडलेला कचरा उचलण्यास सुरवात केली आहे. त्याशिवाय कित्येक दिवसांपासून बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी नव्याने सिग्नल दिवे बसविण्याचे काम पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे. सांतिनेज, दिवजा सर्कल आणि कला अकादमीच्या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. त्याचबरोबर सरकारी खात्याची काही ठिकाणांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. पणजी दूरदर्शनच्या टॉवरलाही रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा टॉवर सध्या झळाळून निघाल्यासारखा दिसू लागला आहे. 

 

भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर स्मार्ट सिटी आणि गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाच्या अगोदरच्या चुकीमुळे खोदण्यात आलेल्या गटारांच्या दुरुस्तीचे काम येत्या दोन-तीन दिवसांत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले. त्याचबरोबर रस्त्यांची डागडुजी करण्याचेही काम महापालिकेने हाती घेतले असून नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील खराब झालेल्या रस्त्यांची माहिती देण्याची सूचनाही केल्याचे ते म्हणाले. एकंदर यंदाचा इफ्फी जानेवारी महिन्यात होणार असला, तरी नोव्हेंबरमधील राजधानीचे नटणे मात्र कायम राहिले आहे.

 

अधिक वाचा :

कळसाचे पाणी वळविल्याने म्हादईवर संकट

गोव्यातील पावसाची अनियमितता धोकादायक ; जागतिक हवामान बदलाच्या परिणामांमुळे पाण्याच्या दर्जा खालावणार 

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारांची धावपळ 

संबंधित बातम्या