‘कार्निव्‍हल’ला अखेर ग्रीन सिग्‍नल

UNI
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पणजी शहरात १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्निव्हलला अखेर प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे गेले काही दिवस कार्निव्हलच्या मार्गावरून सुरू असलेला संघर्ष समाप्त झाला. दिवजा सर्कल - पाटो ते कला अकादमी या जुन्या मार्गावरून कार्निव्हल मिरवणूक काढण्याची परवानगी आज मिळाली, अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

पणजी - पणजी शहरात १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्निव्हलला अखेर प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे गेले काही दिवस कार्निव्हलच्या मार्गावरून सुरू असलेला संघर्ष समाप्त झाला. दिवजा सर्कल - पाटो ते कला अकादमी या जुन्या मार्गावरून कार्निव्हल मिरवणूक काढण्याची परवानगी आज मिळाली, अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली. 

प्रशासनाने परवानगी दिल्‍यामुळे कार्निव्हल आयोजन समितीने तयारी सुरू केली आहे. कार्निव्हल मिरवणूक पणजी शहरात काढण्यासाठी प्रशासनाने पणजी महापालिकेला कालपर्यंत मंजुरी दिली नव्हती. कारण, प्रशासनाने महापालिकेला पत्र लिहून भाऊसाहेब बांदोडकर रस्त्यावर गर्दी नको, त्याऐवजी मिरामार ते दोनापावल रस्त्यावर कार्निव्हल मिरवणुकीचे आयोजन करावे, अशी सूचना केली होती. महापालिका महापौर उदय मडकईकर व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी शहरातच दिवजा सर्कल ते कला अकादमी या बांदोडकर मार्गावर कार्निव्हल मिरवणूक काढणार असल्याचे जाहीर केले होते. शेवटी आज प्रशासनाने आमदार मोन्सेरात यांची मागणी मान्य केली. त्यानुसार भाऊसाहेब बांदोडकर मार्गाच्या दोन्ही बाजूला कार्निव्हल पाहण्यासाठी येणाऱ्या महानीय व्यक्तींना बसण्यासाठी मंच उभारण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती मडकईकर यांनी दिली. मिरवणुकीला फक्त चार दिवस राहिलेले असल्यामुळे कार्निव्हल आयोजन समितीने आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. चित्ररथांची व पथकांची नोंदणीही सुरू झाल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

कोरोना संकट अद्याप असल्यामुळे सर्व नियम पाळून कार्निव्हलचे आयोजन करण्यात येईल. कार्निव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व चित्ररथांनी, पथकांनी व नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन मडकईकर यांनी केले. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेससह महापालिकेतील ज्‍येष्ठ नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी यंदा कार्निव्हल नकोच, अशी  मागणी केली होती. त्या मागणीकडे दुर्लक्ष करून महापालिकेने कार्निव्हल आयोजनाची तयारी जोरात सुरू केले आहे.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या