‘कार्निव्हल’ला अखेर ग्रीन सिग्नल

UNI
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

‘कोविड’ महामारीमुळे राज्यातील कार्निव्हल महोत्सव पणजीमध्ये १३, तर मडगावमध्ये १४ फेब्रुवारीला या दोन ठिकाणीच आयोजित करण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे. या महोत्सवावेळी ‘कोविड - १९’च्या मार्गदर्शक तत्त्‍वांचे पालन करण्यात येणार आहे.

पणजीत १३ रोजी, मडगावात १४ फेब्रुवारीला
पणजी - ‘कोविड’ महामारीमुळे राज्यातील कार्निव्हल महोत्सव पणजीमध्ये १३, तर मडगावमध्ये १४ फेब्रुवारीला या दोन ठिकाणीच आयोजित करण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे. या महोत्सवावेळी ‘कोविड - १९’च्या मार्गदर्शक तत्त्‍वांचे पालन करण्यात येणार आहे. ‘किंग मोमो’साठी २ ते ३ अर्ज आले असून लवकरच कार्निव्हल महोत्सव समितीची बैठक होऊन नाव निश्‍चित केले जाईल, अशी माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

गोवा राज्य जगभरात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी कार्निव्हल महोत्सव मिरवणूक अनेक शहरामध्ये होते. मात्र, यावेळी ‘कोविड’ महामारीमुळे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्निव्हल मिरवणूक घेण्याचा निर्णय काल पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. उत्तर गोव्यात पणजीत तर दक्षिणेत मडगावात घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कार्निव्हल महोत्सवाला देशी व विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असतात. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे अधिक धोका न पत्करता हा महोत्सव मुख्य दोन शहरापुरता सीमित ठेवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत कार्निव्हलसंदर्भात आयोजन समितीची बैठक होऊन कार्यक्रमाची रुपरेषा ठरविली जाणार असल्याचे पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, आज पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले की, काल पर्यटनमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत पणजीमध्ये १३ फेब्रुवारीला कार्निव्हल मिरवणूक होणार आहे. या महोत्सवासाठीची पणजी कार्निव्हल समिती उद्या जाहीर करण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी गेल्या वर्षीप्रमाणेच दिवजा सर्कल ते कला अकादमीपर्यंतचा मार्ग सुचविण्यात आला आहे. लोकांनीही याच मार्गाची विनंती केली आहे. दोन वर्षापूर्वी पणजी शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे मिरामार सर्कल ते दोना पावल हा मार्ग कार्निव्हल मिरवणुकीसाठी ठरविण्यात आला होता. मात्र, गेल्यावर्षीपासून तो बदलण्यात येऊन त्याला लोकांचा मोठा प्रतिसादही लाभत आहे. तसेच मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांनाही हा मार्ग सोयीस्कर असल्याने जुनाच मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे मडकईकर म्हणाले.  

कार्निव्हल महोत्सवादरम्यान सांबा चौकात १३ ते १६ फेब्रुवारी असे चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कोविड महामारीमुळे कार्निव्हल महोत्सवासाठी पणजी महापालिका देणगी जमा करणार नाही.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या