गोवा कार्निवल: महोत्सवाची तयारी पूर्ण; सरकार 60 लाख 35 हजार करणार रुपये खर्च

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

कार्निवल आणि शिगमोत्सव हे गोव्याचे राज्य महोत्सव आहेत. ते बंद करता कामा नयेत कोविड  महामारीचे कारण पुढे करून महोत्सव रद्द केला तर गोवा खड्ड्यात जाईल.

पणजी: गोव्यात उद्या व परवा होणाऱ्या कार्निवल महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सरकार 60 लाख 35 हजार रुपये या महोत्सवांवर खर्च करणार असले तरी यातून सरकारला येणारा महसूल किती तरी पटीने जास्त असतो अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी येथे दिले. ते म्हणाले कार्निवलाची मजा घेण्यासाठी लाखो पर्यटक दोन दिवस आधीच गोव्यात दाखल झालेले आहेत.

त्यानी सांगितले, कार्निवल आणि शिगमोत्सव हे गोव्याचे राज्य महोत्सव आहेत. ते बंद करता कामा नयेत कोविड  महामारीचे कारण पुढे करून महोत्सव रद्द केला तर गोवा खड्ड्यात जाईल. पर्यटनावर आधारित विविध घटकांचा आपण विचार केला पाहिजे. ती अर्थव्यवस्था टिकली तरच गोव्याची अर्थव्यवस्था टिकेल. शो मस्ट गो ऑन यानुसार सारेकाही झाले पाहिजे. यंदा कोविड महामारीचे संकट पाहता केवळ पणजी आणि मडगाव मध्येच कार्निवल महोत्सवाचे आयोजन केले आहे. मास्क वापरून आणि पुरेसे शारीरिक अंतर पाळून प्रत्येकाने कार्निवल मिरवणुकीची मजा घेतली पाहिजे. 

राज्यात आठ ठिकाणी पूर्वी कार्निवल महोत्सव आयोजित केला जात असे. मात्र या यंदा त्यावर मर्यादा आलेली आहे. असे असले तरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून कार्निव्हल महोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा उत्साह कमी झालेला नाही. गेल्या दोन दिवसापासून पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात झालेली आहे. कार्निवल साठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आता उभारण्यात आलेल्या आहेत. या आयोजनावरून माझ्यावर टीका होत असली तरी पर्यटनक्षेत्र टिकले तरच गोव्याची अर्थव्यवस्था टिकू शकेल, यामुळेच या महोत्सवाचे आयोजन करण्याचे धाडस दाखवावे लागले आहे हे समजून घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या