वास्को शहरातील सीसीटीव्ही नादुरुस्त

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

शहर भागातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरासंबंधी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पत्र लिहिणार असल्याचे वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी सांगितले.

दाबोळी: शहर भागातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरासंबंधी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पत्र लिहिणार असल्याचे वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी सांगितले.

 माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दीपक नाईक यांनी मुरगाव पालिकेने १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळालेल्या निधीतून शहर भागात नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी केली आहे.    

 फ्रान्सिस सार्दिन हे दक्षिण गोव्याचे खासदार असताना २०१३ साली वास्को शहर व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. यासाठी सुमारे ७५ ते ८० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या कॅमेऱ्यासाठी मुरगाव पालिका व वाहतूक कक्ष अशा दोन ठिकाणी मॉनिटर्स लावण्यात आले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच अनैतिक प्रकारांना आळा बसण्यास मदत झाली होती. परंतु हळूहळू कॅमेरे नादुरुस्त होऊ लागल्यावर मुरगाव पालिकेने त्यांच्या देखभालीकडे लक्ष दिले नाही. या कॅमेरा पैकी काही कॅमेरे दुरुस्तीच्या नावाखाली नेण्यात आले होते ते पुन्हा बसविण्यात आलेच नाहीत. या प्रकरणी २०१७ मध्ये मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही. आता मडगाव येथील वाळके खून प्रकरणानंतर सीसीटीव्ही कॅमेरा संबंधी चर्चा होऊ लागली आहे.

याप्रकरणी आमदार आल्मेदा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी पुढील आठवड्यात खासदार सार्दिन यांना आपण पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. तेव्हा सार्दिन यांनी खासदार निधीतून कॅमेऱ्याची सोय केली होती. आता दक्षिण गोव्याचे खासदार सार्दिन असल्याने त्यांच्यासमोर हा प्रश्न नेण्यात येईल. कॅमेऱ्यांची दुरुस्ती करावी किंवा तेथे नवीन कॅमेऱ्याची सोय करावी अशी विनंती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

नगरसेवक दीपक नाईक यांनी शहर भागात नवीन कॅमेरे बसवण्यात संबंधी आपण नगराध्यक्षांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले. मुरगाव पालिकेने स्वतःच्या निधीतून किंवा १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत मुरगाव पालिकेला मिळालेल्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय करावी. सीसीटीव्ही कॅमेरा लावणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या