GOA: ‘जनतेच्या दु:खास मुख्यमंत्रीच जबाबदार’

sawant 3.jpg
sawant 3.jpg

पणजी: आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी त्यांच्या हट्टीपणामुळे योग्य टाळेबंदीला (Lockdown) नकार दिल्याबद्दल तसेच त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्णत: नाकारल्याबद्दल जबाबदार धरले आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून गोव्यात (Goa) होणाऱ्या उच्च पातळीवरील रुग्ण सापडण्याचा दर आणि मृत्यूचा संदर्भ देताना राज्य संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) म्हणाले की, गोमंतकीयांचे दु:ख वाढवण्यासाठी मुख्यमंत्री थेट जबाबदार आहेत. (GOA Chief Minister responsible for peoples woes)

म्हांबरे यांनी नमूद केले आहे, की मुख्यमंत्री म्हणतात की रुग्णसंख्या कमी झाली आहे, पण हे अंशतः कमी होणाऱ्या चाचणीमुळे होत आहे. आता प्रतिदिन 7 हजारावरून चाचण्या 4 हजारावर गेल्या आहेत. त्यामुळे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दररोज सरासरी 40 गोमंतकीय कोविडमुळे मरत आहेत. आपने मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना 17 फेब्रुवारी रोजी कोविडच्या दुसऱ्या लाटेबाबत सतर्क केले होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांचे लक्ष निवडणुका आणि खिशे भरण्याकडे होते. एप्रिलच्या उत्तरार्धात दुसरी लाट पूर्णपणे आल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेण्यास व राज्यात योग्य अशी टाळेबंदी करण्यास नकार दिला होता.

त्यांनी म्हटले आहे, की दोन किंवा तीन आठवड्यांच्या छोट्या परंतु पूर्ण टाळेबंदीचा चांगला परिणाम होऊ शकतो. परंतु मुख्यमंत्री सावंत यांच्या वाढीव “बनावट टाळेबंदी”ने जिवाचे रक्षण करण्यास मदत केली नाही किंवा जीवनाचे रक्षणही केले नाही. कोविड इस्पितळात इतक्या मोठ्या संख्येने सक्रिय प्रकरणे आणि संपूर्ण अनागोंदी कारभारामुळे सरकार संचारबंदीची अंमलबजावणी अधिक चांगली करेल आणि गृह अलगीकरणाच्या पर्यायाला बळकटी देईल अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी सरकारने आपली सर्व जबाबदारी सोडून दिली आहे आणि कोणतेही मंत्री किंवा अधिकारी या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचे दिसत नाही.

सरकारने गृह अलगीकरण प्रक्रियेपासून आपले हात कसे काढून घेतले आहेत. गृह अलगीकरणात असणाऱ्या रुग्णाला योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे, त्यांना ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासणी करायला सांगणे आणि दररोज दूरध्वनीद्वारे डॉक्टरांद्वारे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. ऑनलाईन नोंदणीची आवश्यकता दूर करून, गृह अलगीकरणात असलेले रुग्ण काय करीत आहेत, यावर कोणतीही देखरेख नाही. नंतर गंभीर परिस्थितीत ते रुग्णालयात पोहोचल्यानंतर ते उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशांच्या मृत्यूला  त्यांनाच जबाबदार धरण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला गेला. ‘आप’ने नेमके याच कारणास्तव आपली डॉक्टर हेल्पलाइन आणि ऑक्सिमीटर सेवा सुरू केली असे त्यांनी म्हटले आहे.

गोव्यापेक्षाही गंभीर संकटांवर मात करणारे दिल्ली व महाराष्ट्र यासारख्या राज्यांकडे लक्ष वेधून त्यांनी म्हटले आहे, की दिल्लीचा रुग्ण सापडण्याचा दर हा आता २ टक्क्यांहून कमी झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी केलेल्या संवादात संपूर्ण प्रामाणिकपणा, स्पष्ट सूचना आणि शांत वागणूक दिसून येत होती, यामुळेच लोक संकटात असतानाही त्यांचे ऐकत होते, त्यांचे म्हणणे समजून घेऊन त्यांना सहकार्य करत होते. दुसरीकडे डॉ.  सावंत यांनी अडचणी कबूल न करता आणि खाटांची कमतरता किंवा ऑक्सिजनच्या संकटासारख्या गंभीर बाबींवर तोडगा न काढता,सर्व काही ठीक आहे असा सूर लावून धरला. टाळेबंदी लागू न करता त्यांनी सर्व काही खुले ठेवून संचारबंदी, निर्बंध वगैरे अशा अस्पष्ट शब्दांनी लोकांना गोंधळात टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com