गोवा मुख्यमंत्री शपथविधी; ज्येष्ठांना मिळणार मंत्रिपदे

मंत्रिपदापेक्षा खातेवाटपाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू
Goa CM Pramod Sawant, Goa CM Pramod Sawant oath ceremony news, Goa CM oath ceremony news
Goa CM Pramod Sawant, Goa CM Pramod Sawant oath ceremony news, Goa CM oath ceremony newsDainik Gomantak

गोवा: शपथविधीची तारीख ठरल्याने काही ज्येष्ठांना मंत्रिपदे मिळणार आहेत, हे निश्‍चित असले, तरी त्यांचा डोळा वजनदार खात्यांवरच आहे. गृह, अर्थ, नगरनियोजन, सार्वजनिक बांधकाम यासारख्या महत्त्वाच्या खात्यांवर सर्वांचेच लक्ष आहे. शिक्षण, कृषी यासारखी सामान्यांसाठी महत्त्वाची खाती मात्र कुणालाच नको आहेत, हे विशेष.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अर्थ आणि गृह खाते इतरांकडे देणार नाहीत. त्यामुळे साहजिकच या महत्त्वाच्या खात्यांवर डोळा ठेवून असलेल्यांचा अपेक्षाभंग होणार आहे. त्यामुळे सध्या मंत्रिपदापेक्षा खातेवाटपाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून ‘नाकापेक्षा मोती जड’ अशी ही अवस्था झाली आहे.(Goa Chief Minister swearing ceremony)

Goa CM Pramod Sawant, Goa CM Pramod Sawant oath ceremony news, Goa CM oath ceremony news
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता कॅमेऱ्याची नजर

असेल दिगंबरचा हरी...

‘असेल माझा हरी, तर बसून देईल खाटल्यावरी’, राजकारणात जर अशी वृत्ती कुणी बाळगली तर त्याचा दिगंबर होतो. दिगंबर म्हणजे आमचे मडगावचे बाबा दिगंबर कामत. माझ्यामागे दामबाब आहे. त्याच्या मनात असेल तर मी मुख्यमंत्रीही होऊ शकतो, असे म्हणत निवडणुकीवेळी कामत मडगावातच गुरफटून राहिले. परिणामी मडगावात त्यांचा दणदणीत विजय झाला. पण इतर कुठे न फिरल्याने सासष्टी हातची गेली आणि काँग्रेस आमदारांची संख्या 11 वर आली. त्याबाजूने बार्देस गढ राखून कानामागून आलेला मायकल तिखट होत आता विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगू लागला आहे. तरीही दिगंबर सारा भार दामबाबावरच घालून स्वस्थ बसले आहेत. किती भार घेणार हो दामबाब आपल्या खांद्यावर? ∙∙∙

खेमल्यांचा विलाप

सावर्डे मतदारसंघात काँग्रेस उमेदवार म्हणून उभे राहिलेले खेमलो सावंत यांना फक्त ३७६ मते मिळाली. वास्तविक खेमलो सावंत कुठेही उभे राहिले असते तरी त्यांची झेप हजारांपुढे जाऊ शकणार नाही, असा त्यांचा राजकीय वकूब. तरीही त्यांचे मित्र गिरीश चोडणकर यांनी त्यांना सावर्डेच्या बोहल्यावर उभे केले.

आता खेमलो गिरीशच्या नावानेच खडी फोडत आहेत. आपण साखळीत उमेदवारी मागितली होती; पण मला सावर्डेची उमेदवारी का दिली हे फक्त गिरीशनाच माहीत, असे ते म्हणतात. त्यांना साखळीची उमेदवारी दिली असती तर ते मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकले असते का? ∙∙∙

शॅडो आमदार

काणकोण मतदारसंघातून सुमारे तीन हजार मतांच्या फरकाने रमेश तवडकर भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले. मात्र, सध्या कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळविलेले जनार्दन भंडारी यांना त्यांचे कार्यकर्ते ‘शॅडो आमदार’ म्हणू लागले आहेत. त्यात काही प्रमाणात तथ्यही असल्याची चर्चा सध्या काणकोण मतदारसंघात सुरू आहे. मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले माजी उपसभापती तथा अपक्ष उमेदवार इजिदोर फर्नांडिस चिडीचूप झाले आहेत.

चौथ्या क्रमांकावरील माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार विजय पै खोत यांचाही मतमोजणीनंतर पत्ताच नाही. त्यातल्या त्यात निवडणुकीनंतर व मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जनतेचे प्रश्न घेऊन जनार्दन भंडारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. काणकोणमधील जनतेचा पाणी प्रश्न, वीज प्रश्न धसास लावण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. आता ते चक्क प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. तसे झाल्यास काणकोणवासीयांना आपला ‘शॅडो आमदार’ गमवावा लागणार आहे. ∙∙∙

भाजपधार्जिणे तेवढेच राष्ट्रवादी?

शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच म्हापशातील लोकमित्र मंडळातर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले म्हापशाचे भाजप आमदार जोशुआ डिसोझा यांच्यासह एकूण एक प्रमुख मान्यवर त्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. म्हापसा परिसरात काही स्वातंत्र्यसैनिक असतानाही त्यांना या कार्यक्रमातून पद्धतशीरपणे डावलण्यात आले; तसेच, अन्य राजकीय पक्षांतील नेत्यांनाही साधे निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व्यक्ती केवळ भाजपमध्येच आहेत का, अशी चर्चा सध्या म्हापशात ऐकावयास मिळते आहे. केवळ भाजपधार्जिण्या लोकांना त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आणण्याचे नेमके कारण सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. ∙∙∙

Goa CM Pramod Sawant, Goa CM Pramod Sawant oath ceremony news, Goa CM oath ceremony news
Goa Corona Updates: नवे दोन बाधित, 14 रुग्ण बरे

केल्याने तीर्थाटन...

निवडणुकीआधी आणि नंतरही बहुतेक राजकारणी देवदर्शनाला जातात. निवडणुकीआधी निवडणूकीत यश दे, ही मागणी घेऊन आणि जिंकून आल्यानंतर देवाचे आभार मानण्यासाठी तीर्थाटने केली जातात. ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी एक म्हण आहे. काणकोणचे आमदार रमेश तवडकर सध्या तीर्थाटन करीत आहेत.

कदाचित हे त्यांचे तीर्थाटन मंत्रिमंडळात मानाचे मंत्रिपद मिळो, ही मागणी त्यांनी या तीर्थाटनावेळी देवाकडे नक्कीच केली असेल आणि त्यांच्या समर्थकांची तीच मागणी आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या त्यांच्या खास ११ कार्यकर्त्यांनीही तेच साकडे कर्नाटकातील देवांकडे घातले असावे. काही का असेना, निवडणुकीत देव त्यांच्यासाठी धावून आला. आता ‘भगवान के घर देर है, अंधेर नही!’ असे म्हणतात, ते तवडकरांच्या बाबतीत खरे ठरेल... ∙∙∙

...तरीही बॅटरी फुल्ल?

निवडणूक निकालानंतर 15 दिवस होत आले; पण अनेक उमेदवारांना आपला पराभव झाला असल्याचे पटतच नाही. मतदान यंत्रात काही तरी गडबड केली, म्हणूनच आपला पराभव झाला असल्याचे अनेक पराभूत उमेदवार आता बोलू लागले आहे. याला तशी अनेक कारणेही आहे. दिवसभर शेकडो वेळा यंत्राचे बटण दाबून झाल्यावर सुद्धा महिनाभर यंत्रातील बॅटरी चक्क मतमोजणीवेळी 99 टक्के इतकी फुल्ल होती. आहे की नाही यंत्रातील भुताची कमाल. वास्तविक महिनाभरानंतर मतदान यंत्रातील बॅटरी थोडी तरी डिस्चार्ज व्हायला हवी होती; पण ती 99 टक्के फुल्ल होती.

अनेक यंत्रांत मतदानाचा आकडा जुळत नव्हता. काही ठिकाणी आपला पराभव होणार म्हणून सांगणारे महाभाग पैजा मारून निवडून आले. त्यामुळे मतदान यंत्रात गडबड केली असावी, असा संशय बळावत चालला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्र अद्यापही मतपत्रिकेद्वारे मतदान घेतात; कारण मतदान यंत्र शेवटी माणसानेच विकसित केले आहे. त्याचा गुपित अंक मिळाल्यास कोणताही बदल करणे शक्य असल्याचे अनेकजण दाव्यानुसार सांगतात आणि ते सोशल मीडियावर अनेकांनी सिद्ध केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता गोव्यातील मतदान यंत्रांत भुताने बदल घडवून आणला की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बाबूंचे काय झाले?

निवडणुकीत दोन बाबू उतरले खरे; पण दोघेही पराभूत झाले. या दोनपैकी पेडण्याचे माजी आमदार बाबू आजगावकरांचे ठीक आहे हो, पण केपेच्या बाबू कवळेकरांना लागलेला ‘जोर का झटका’ त्यांना संभ्रमित करून गेला आहे. विरोधात असताना त्यांना लोकांनी भरभरून मते दिली. मग आता सत्तेत असताना मतदारराजा का बरे त्यांच्यावर रुसला? याचे कोडे अजूनही सुटलेले नाही. तरीही केपेच्या लोकांनी आमदार निवडून आणला खरा; पण तोही सत्तेबाहेरचा. त्यामुळे आता करून घ्या कशी ती तुमची कामे, अशी टीकाटिप्पणी बाबू समर्थक करत आहेत.

साहेब, इथे नव्हे तिथे बोला!

प्रत्येकाने आपले काम जबाबदारी ओळखून केल्यास काम फत्ते होते, असे म्हणतात ते खरे. आमदारांचे काम गटार बांधणे व कचरा साफ करण्याचे नसून, आमदाराने विधानसभेत विविध विषयांवर चर्चा करणे अपेक्षित असते. कुंकळ्ळीचे आमदार युरी यांच्याकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. युरी आलेमाव यांनी एका प्रभागात साचलेला कचरा साफ करण्यात बरीच मेहनत घेतली. याबद्दल युरी समर्थक त्यांची तोंड भरून स्तुती करीत आहेत. विरोधक मात्र युरीला सत्य सांगायला लागले आहेत, ‘युरीबाब, तुमचे काम विधानसभेत लोकांच्या समस्या मांडायचे आहे. कचरा साफ करण्याचे नव्हे.’ ∙∙∙

निवडणुकीचा बोजा देवावर

गोव्यातील बहुतेक सर्व लहान-मोठे देव गेले काही महिने प्रचंड दडपणाखाली असावेत व निकाल जाहीर झाले तरी ते दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. निवडणूक प्रचारकाळात विरोधकांकडून झालेल्या आरोपाबाबतही देवावरच हवाला टाकण्याचे प्रकार आता सुरू झालेले आहेत. तेवढ्याने भागत नाही. सत्ता वा मंत्रिपदांबाबतही अनेकांनी असाच देवावर हवाला ठेवला होता. आता मतांसाठी पैसे घेऊन मते न दिलेल्यांबाबत जर देवाकडे संबंधितांनी गाऱ्हाणे घातले नाही, म्हणजे मिळवले. ∙∙∙

गाड्यांची परंपरा

मडगावात नेमके किती गाडे आहेत व त्यातील कायदेशीर किती याची आकडेवारी ना नगरपालिकडे आहे, वा अन्य कोणा यंत्रणेकडे. आके येथे उभा केलेला व त्याबाबत समाजमाध्यमांवर सवाल केल्यानंतर हटविलेल्या गाड्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला आहे. हा एकच नाही, यापूर्वी गाड्यांच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर पालिकेने बेकायदेशीर ठरवून हटविले गेलेले गाडे परत मूळ जागी नेऊन ठेवण्याची वेळ पालिका निरीक्षकांवर आली आहे. त्यामुळेच ते अशा गाड्यांकडे दुर्लक्ष तर करत नसावेत ना? ∙∙∙

फोंड्यात चलबिचल

मंत्रिपदावरून सध्या अनेक सत्ताधारी आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. कुणाकुणाला मंत्रिपद मिळेल, हे सध्या तरी गुलदस्त्यात असल्याने ही अस्वस्थता आहे. फोंडा तालुक्यात तर चारही मतदारसंघांना मंत्रिपद मिळेल, अशी आवई उठली आहे. पण एका फोंडा तालुक्याला जर एवढे झुकते माप मिळाले, तर मग इतर तालुक्यांचे काय? असा सवाल उठणे साहजिकच आहे. त्यामुळे फोंडा तालुक्याला प्रत्यक्षात किती मंत्रिपदे मिळणार, यावरून काही आमदारांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांत चलबिचल वाढली आहे. ∙∙∙

Goa CM Pramod Sawant, Goa CM Pramod Sawant oath ceremony news, Goa CM oath ceremony news
गोव्यात सभापतींची निवड 29 मार्चला

दरवाढीमुळे मिळाले काम!

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्यावर तेल कंपन्यांनी डिझेल व पेट्रोलची दरवाढ केली. साहजिकच स्वयंपाक गॅसचे दरही भडकले. त्यामुळे झाले असे, की निवडणुकीनंतर सरकार स्थापनेची स्वप्ने पाहाणाऱ्या; पण प्रत्यक्ष निकालाने भ्रमनिरास झालेल्या काँग्रेसवाल्यांना काम मिळाले आहे. सध्या त्यांनी या इंधन दरवाढीविरुध्द निदर्शने सुरू केली आहेत. कसे का असेना, लोकांसमोर राहाण्याचा हा प्रयत्न अशीच प्रतिक्रिया ऐकू येते. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com