गोमंतकीयांना लवकरच मिळणार ‘डिजी’लॉकर सुविधा; जाणून घ्या काय फायदा होणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

राज्य सरकारने सध्या ई-प्रशासनावर जोर दिलेला असून त्यालाच धरून सर्व सरकारी खात्यांमध्ये डिजीलॉकर प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत डिजिटल स्वरूपात कागदपत्रे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

पणजी : राज्य सरकारने सध्या ई-प्रशासनावर जोर दिलेला असून त्यालाच धरून सर्व सरकारी खात्यांमध्ये डिजीलॉकर प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत डिजिटल स्वरूपात कागदपत्रे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी मूळ कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज भासणार नाही. माहिती तंत्रज्ञान खात्याने यासंदर्भात नुकताच विविध खात्यांना माहिती देणारा कार्यक्रम आयोजित केला. त्यात विविध खात्यांच्या प्रमुखांसह गोवा विद्यापीठ आणि गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासारख्या शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांचा समावेश होता. माहिती तंत्रज्ञान खाते राज्यात डिजीलॉकर प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहत असून ‘नॅशनल ई-गव्हर्नन्स’ विभागाच्या साहाय्याने त्यांचे काम चालू आहे.

गोव्यात बँका सलग चार दिवस बंद; बँकांच्या खासगीकरणाला विरोध

डिजीलॉकरच्या अंतर्गत सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे ‘क्लाऊड’मध्ये साठवली जातात. त्यामुळे प्रत्यक्ष कागदपत्रांची गरज भासत नाही. जर नागरिकांची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे डिजीलॉकरमध्ये साठवली गेली असतील आणि ती प्रमाणित असतील, तर नागरिकांना मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले जाणार नाही. लाभ काय? या सुविधेच्या अंतर्गत एखादा नागरीक त्याच्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती ‘अपलोड’ करू शकतो आणि त्याला त्यांचा कुठेही वापर करता येतो वा कुठेही त्या उपलब्ध होऊ शकतात. तथापि, त्यासाठी नागरिकांना मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल आणि आधार कार्डाशी जोडलेली ‘क्लाउड स्टोअरेज’वरील जागा मिळविण्यासाठी डिजीलॉकर खाते उघडावे लागेल.

मगोचे आमदार सुदीन ढवळीकरांनी सुरुवातीला मांडलेली याचिका घेतली मागे

नोडल अधिकाऱ्यांमार्फत देखरेख सध्या प्रत्येक शासकीय खात्यास डिजीलॉकर उपक्रम राबविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यास आणि डिजीलॉकर मंचावर नोंदणी करण्यास सांगितले आहे. ‘गोवा ऑनलाईन पोर्टल’वर सध्या 30 सरकारी खाती अपलोड करण्यात आलेली असून 136 विविध सेवा तिथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच जवळजवळ 10 हजार कागदपत्रे व प्रमाणपत्रे ‘गोवा ऑनलाईन पोर्टल’मार्फत डिजी खात्यांत टाकली गेली आहेत. डिजीलॉकर प्रकल्पासंदर्भात माहिती तंत्रज्ञान खात्याकडून आणखी जागृती करण्यात येणार असून त्यादृष्टीने कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या