"गोवेकरांनो प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या," मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

"गोवेकरांनो प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या," मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Goa CM Dr Pramod Sawant said The public should come forward to donate plasma

पणजी: काल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेशी संवाद साधला. गोव्यात लॉकडाऊन लावणे हा कोविड प्रसार रोखण्यावरील प्रभावी उपाय नव्हे, असे म्हणत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविड व्यवस्थापनात जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले. सोशल मिडियाच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी सात वाजता सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी हा संवाद साधला.

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे
सध्या राज्यात रात्रीची संचारबंदी आहे. राज्याचे अर्थचक्र थांबवणे परवडणारे नाही. अनेकांचा रोजगार टाळेबंदी हिरावून घेते. त्यामुळे कोविड व्यवस्थापनावर आम्ही सर्वांनी भर दिला पाहिजे असे नमूद करून ते म्हणाले, रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करण्यासाठी कोविडमुक्त झालेल्यांनी पुढे आले पाहिजे. त्यांच्या इस्पितळापर्यंत जाण्या-येण्याची सोय सरकार करेल. याशिवाय प्रोत्साहनपर प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता रक्तद्रवाची गरज मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. त्याच्या दानासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेने पुढे यावे.

लसीकरणातून मृत्यूदर कमी करता येईल

कोविड नियंत्रणासाठी लसीकरण हाही एक प्रभावी उपाय आहे. लस घेतलेल्यास कोविडची लागण झाल्यास गुंतागुंत होत नाही. इस्पितळात दाखल व्हावे लागत नाही. त्यामुळे सध्या 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी यासाठी प्रयत्न आहेत. या वयोगटातील पाच लाख जण राज्यात आहेत त्यापैकी केवळ अडीच लाख जणांनी लस घेतली आहे. इतरांनी लस घेण्यासाठी पुढे यावे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध केली जाणार आहे. सरकारी इस्पितळात ही लस मोफत उपलब्ध असेल. पुण्याच्या सिरम इन्सिस्ट्यूटकडून कोविडशिल्ड ही लस सरकार आणणार आहे. ती घेण्यासाठी गर्दी करू नये कारण सर्वानाच सरकार लस देणार आहे. लसीकरणातून मृत्यूदर कमी करता येईल.

दोन वैद्यकीय प्राणवायू निर्मिती प्रकल्प 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडातून राज्याला दोन वैद्यकीय प्राणवायू निर्मिती प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यापैकी एक प्रकल्प गोमेकॉत 15 दिवसांत कार्यान्वित केला जाईल. दुसऱ्या प्रकल्पाची उभारणी फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात केली जाणार आहे. आता आढावा घेतल्यानुसार गोमेकॉतील अतिविशिष्ट विभागाची इमारत 15 मेपासून कोविड इस्पितळ म्हणून वापरात आणता येणार आहे. त्या कामाच्या प्रगतीवर आरोग्यमंत्री विश्वजित राणे लक्ष ठेऊन आहेत.

तीन वर्षांत 50 हजार रोजगार निर्मिती 

येत्या तीन वर्षांत 50 हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. मोप येथील आंतरराष्ट्रीय हरित विमानतळ, परिषदगृह (कन्वेन्शन सेंटर), माहिती तंत्रज्ञान धोरण, स्टार्टअप धोरण, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ या माध्यमातून ही रोजगार निर्मिती होणार आहे. तुये येथील इलेक्ट्रॉनिक्स सिटी हा प्रकल्पही लवकरच जनसेवेत रुजू होणार आहे.

स्वयंपूर्ण गोवाच्या दिशेने...
गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षात उर्वरीत १० महिन्यांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन कोविड काळातील निर्बंध पाळून करण्याचा विचार आहे. मुक्तीपूर्व गोवा, दूध, फळे, फुले, भाजीपाला, अंडी, कोंबडी, मांस या दृष्टीने स्वयंपूर्ण होता. तो पून्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या 19 डिसेंबरपूर्वी हे लक्ष्य गाठण्याचे ध्येय आहे. सध्या शेजारील राज्यांवर गोवा अवलंबून आहे. दोन दिवस वाहतूक बंद पडली तरी हाहाकार उडतो. ही स्थिती पालटवली गेली पाहिजे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com