मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचे उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

साखळी मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात जनतेच्या सेवेसाठी अशी कार्यालये उभी राहणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

डिचोली: सरकारचे कार्य आणि कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी भाजप कार्यकर्ते सदैव तत्पर असतात. कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढतानाच, सरकारचे कार्य आणि कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोचण्यास मदत होत असते, असे उद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुडणे येथे काढले.

पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून साखळी मतदारसंघातील कुडणे येथे भाजप कार्यालयाचे उद्‌घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. साखळी मतदारसंघातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात जनतेच्या सेवेसाठी अशी कार्यालये उभी राहणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 

सामाजिक नियमांचे पालन करून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कुडणेचे ज्येष्ठ नागरिक गोकुळदास मळीक यांच्या हस्ते फित कापून या कार्यलयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य सुभाष मळीक, सुहास देविदास, बाबुसो वेरेकर, गणेश घाडी, अंकिता नाईक, दत्ताराम माडकर, जयेश मळीक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सुभाष मळीक यांचे प्रास्ताविकपर भाषण झाले. अतुल मळीक यांनी सूत्रसंचालन केले, तर हर्षद पराडकर यांनी आभार मानले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या