
CM Pramod Sawant : जगातील इतर देशांना मार्गदर्शन करणारा भारत देश विश्वगुरु व्हावा, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून हे स्वप्न साकारण्यासाठी इतरांबरोबरच युवावर्गाची तेवढीच समर्थ साथ आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
फर्मागुढी - फोंड्यातील पीईएस शिक्षण संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘मोदी 20’ या पुस्तकावरील परिसंवाद तसेच उपयुक्त माहिती देण्याच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.
सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आता देशाचे पंतप्रधान म्हणून सूत्रे सांभाळताना देशाला प्रगतीपथावर नेण्याबरोबरच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळाले आहे. कोविड महामारी असूदे किंवा इतर आपत्ती, प्रत्येकवेळी पंतप्रधानानी धिरोदात्तपणे सामना करीत देशाला सावरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची ओळख ही विश्वगुरु व्हावी यासाठी प्रयत्न चालवले असून संशोधन करणाऱ्या संस्थांना राज्य सरकारही प्राधान्य देणार असून समर्थ भारताचा हा टप्पा असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
कृषीमंत्री रवी नाईक म्हणाले की, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व मिळाले असल्याने आज देशाची प्रगती होत आहे. कोविड महामारीसारख्या आपत्तीत देशातील सर्वांना मोफत लस उपलब्ध करतानाना मोदीजींनी जात, धर्म, पंथ याचा विचार केला नाही. सारे भारतीय आपले आहेत, हाच उदात्त विचार त्यांनी केला, त्यामुळेच आज कोविड महामारीपासून आपण सर्वजण बचावलो असल्याचे रवी नाईक म्हणाले. देशाच्या उत्कर्षासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखेच कणखर नेतृत्वाच आज गरज असल्याचे सांगून युवा वर्गाने मोदीजींच्या कार्याचा वारसा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सदानंद तानावडे यांनीही मोदीजींमुळे आज देश सुस्थितीत असून देशाच्या जडणघडणीत मोदीजींनी दिलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे नमूद केले.
भारत देश विश्वगुरु होण्यासाठी नवनवीन संकल्पना कार्यरत होत असून राज्य सरकारनेही रिसर्च फाऊंडेशनला प्राधान्य दिले आहे. एखादी शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालय संशोधनात्मक काम करीत असेल तर त्यांना पहिले प्राधान्य देऊन सरकार सर्व सहकार्य करील, यासंबंधीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याचेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.