गोवा महाविद्यालय ग्रंथपाल संघटना प्रयत्नशील: युवा पिढीत वाचनसंस्कृती रुजवणार

प्रतिनिधी
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

गोवा विद्यापीठाशी तसेच उच्च शिक्षण संचालनालयाशी संलग्नित असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाला ‘समान ग्रंथालय ऑटोमेशन सॉफ्टवेअर’ असावे, ग्रंथालये अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, उच्य शिक्षण संचालनालयाच्या पुरस्कारांसाठी ग्रंथपालांच्या नावांचाही विचार करावा इत्यादींबाबत सरकारदरबारी प्रयत्न करण्यात येईल.

गोवा विद्यापीठाशी तसेच उच्च शिक्षण संचालनालयाशी संलग्नित असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाला ‘समान ग्रंथालय ऑटोमेशन सॉफ्टवेअर’ असावे, ग्रंथालये अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करावा, उच्य शिक्षण संचालनालयाच्या पुरस्कारांसाठी ग्रंथपालांच्या नावांचाही विचार करावा इत्यादींबाबत सरकारदरबारी प्रयत्न करण्यात येईल. -बाळा मांद्रेकर, अध्यक्ष, गोवा महाविद्यालय ग्रंथपाल संघटना

म्हापसा, ता. २५ (प्रतिनिधी) : समाजात सध्याच्या युवा पिढीत वाचनसंस्कृती खालावत चालल्याने त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न गोवा महाविद्यालय ग्रंथपाल संघटनेमार्फत केला जाईल, अशी माहिती या संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळा मांद्रेकर यांनी दिली.

यासंदर्भात ते पुढे म्हणाले, की मुलांचा वाचनाकडे असलेला ओढा दिवसेंदिवस कमी होत चालल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, आवश्यक ठरते. पदवी पातळीवरील शिक्षणक्रमात प्रथम वर्षासाठी एका सेमिस्टरमध्ये ‘ग्रंथपाल माहिती विज्ञान’ हा विषय अंतर्भूत करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. मांद्रेकर पुढे म्हणाले, गोव्यात शैक्षणिक स्तरावर ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देऊन ग्रंथालयसेवेत सुधारणा घडवणे, राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रे व वेबिनार्सचे आयोजन करणे, ग्रंथालयांत काम करणाऱ्यांसाठी मूल्यसंस्कार, आचारसंहिता, प्रमाणीकरण इत्यादींचे विकसन करणे, राष्ट्रीय तसेच अन्य राज्यांतील ग्रंथपाल संघटनांशी समन्वय साधून त्यांच्या सहयोगाने काही उपक्रम राबवणे असे काही उपक्रम नजीकच्या काळात संघटनेमार्फत राबवले जातील. गोवा विद्यापीठाच्या ॲकॅडेमिक काउन्सिलवर महाविद्यालयीन ग्रंथपालांना पुरेसे प्रतिनिधित्व देण्याच्या मागणीचा पुरस्कार करण्यात येईल.

गोव्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या ग्रंथपालांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने गोवा महाविद्यालय ग्रंथपाल संघटनेची स्थापना २०१६ मध्ये झाली. या संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निर्मला परब तसेच मानसी रेगे, बाळा मांद्रेकर, डॉ. केशव धुरी, डॉ. जयप्रकाश यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी एकत्रित आल्यानेच या संघटनेच्या कार्याला प्रारंभ झाला.

संबंधित बातम्या